Sambhaji Raje बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर चर्चेत आलेले वाल्मिक कराड हे आता पुण्यातील सीआयडी कार्यालयात पोलिसांना शरण आले आहेत. शरण येण्यापूर्वी त्यांनी स्वतःचा एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. ज्यामध्ये त्यांनी स्वतःवरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. राजकीय द्वेषापोटी माझ्याविरोधात आरोप केले जात असून जर पोलिस तपासात मी दोषी आढळलो तर जी शिक्षा होईल, ती भोगण्यासाठी मी तयार असल्याचे ते म्हणाले आहेत. दरम्यान या प्रकरणी संभाजीराजे छत्रपती यांनी प्रतिक्रिया दिली आहे आणि वाल्मिक कराडवर मोक्का लावण्याची मागणी केली आहे.
वाल्मिक कराड सात आरोपींचा म्होरक्या
वाल्मिक कराड हा संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सात आरोपींचा म्होरक्या आहे. शरण आल्याने विषय संपत नाही. वाल्मिक कराडच्या नावे १४ गुन्हे आहेत तरीही बॉडीगार्ड घेऊन हा वाल्मिक कराड फिरतो, १४ गुन्हे दाखल असताना योग्य ती कारवाई का झालेली नाही? असा सवाल संभाजीराजे छत्रपतींनी केला आहे.
वाल्मिक कराडला मोक्का लावला गेलाच पाहिजे-संभाजीराजे
संभाजीराजे पुढे म्हणाले, “विधानसभेच्या पटलावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीने सांगितलं की आरोपींना मोक्का लावणार. सात आरोपींचा हा म्होरक्या आहे, त्याच्यावरही मोक्का लावणं महत्त्वाचं आहे आणि गरजेचं आहे. खंडणीच्या गुन्ह्यात त्याला अटक केली आणि तो उद्या जामीन घेऊन बाहेर येईल हे काही आम्ही शांतपणे पाहणार नाही. खुनाचा गुन्हा कसा नोंद करणार याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी द्यावं. धनंजय मुंडेंना मंत्रिपदावरुन खाली खेचणं, तसंच पालकमंत्रिपद तर मुळीच न देणं यावर मुख्यमंत्र्यांनी बोललं पाहिजे. तसंच अजित पवार हे संतोष देशमुख हत्या प्रकरणावर काहीही का बोलले नाही? तुम्ही धनंजय मुंडेंना संरक्षण का देत आहात? वाल्मिक कराडबाबत बीडमध्ये कुणालाही विचारा ते तुम्हाला सांगतील की तो सात आरोपींचा म्होरक्या आहे. या म्होरक्याला धनंजय मुंडेंचा आशीर्वाद आहे.” असं संभाजीराजे म्हणाले.
हे पण वाचा- Bajrang Sonavane : वाल्मिक कराड शरण आल्यानंतर बजरंग सोनावणेंची पहिली प्रतिक्रिया, “सीआयडीने आता…”
वाल्मिक कराडला शरण येण्यासाठी २२ दिवस का लागले?
वाल्मिक कराड शरण आला म्हणजे विषय संपला असा अर्थ होत नाही. उलट आता सरकारची जबाबदारी वाढली आहे. सीडीआर तपासला गेला पाहिजे. वाल्मिक कराड पुण्यात होता हे तीन दिवसांपासून पोलिसांना समजलं कसं नाही? वाल्मिक कराडला शरण येण्यासाठी २२ दिवस का लागले? तो जर शुद्ध आणि सरळ असता तर दुसऱ्या दिवशीच शरण आला असता. लोकांचा आक्रोश पाहिल्यानंतर, बँक खाती गोठवल्यानंतर शरण यायचं ही कोणती पद्धत? वाल्मिक कराडला मोक्का लावत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. वाल्मिक कराड हा सात आरोपींइतकाच हत्येसाठी जबाबदार आहे.
धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात काय चर्चा झाली ते समजलं पाहिजे
धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांची काय चर्चा झाली? त्यानंतर आज वाल्मिक कराड शरण कसा आला? हा आमचा सवाल आहे. अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊन आला आहे. एवढं सगळं असताना सीआयडीने अटक का केलं नाही? यात जे काही दडलं आहे ते समोर आलं पाहिजे अशीही मागणी संभाजीराजेंनी केली.