राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाल्यानंतर भाजपाच्या गोटात जल्लोष साजरा करण्यात येत आहे. राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये जशी कमाल केली अगदी तशाच पद्धतीने विधानपरिषदेच्या निवडणुकीतही चमत्कार होणार असा विश्वास भाजपाचे नेते व्यक्त करत आहेत. तर दुसरीकडे संजय पवार यांच्या पराभवामुळे संभाजीराजे छत्रपती यांच्या समर्थकांनीही जल्लोष साजरा केला आहे. त्यांच्या समर्थकांनी मुंबईच्या शिवसेना भवनासमोर छत्रपतींच्या अपमानाचा बदला घेणाऱ्या आमदारांचे आभार अशा आशयाचे बॅनर लावले आहे. याच बॅनरबाजीनंतर खुन्नस म्हणून कोणाच्याही कार्यालयासमोर अशी कृती करणे, हे माझ्या तत्त्वात बसत नाही, असं संभाजी छत्रपती म्हणाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमकं काय घडलं?

शिवसेनेचे कार्यकर्ते तथा कोल्हापूरचे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांचा राज्यसभेच्या निवडणुकीत पराभव झाला. या जागेवरुन संभाजीराजे छत्रपती निवडणूक लढवण्यास उत्सुक होते. मात्र शिवसेनेने त्यांना पाठिंबा देण्याऐवजी संजय पवार यांना उमेदवारी दिली. त्यानंतर पवार यांचा पराभव झाल्यामुळे आता संभाजीराजे छत्रपती यांच्या समर्थकांकडून आनंद साजरा करण्यात येत आहे. निकालानंतर संभाजीराजेंच्या समर्थकांनी शिवसेनेचे मुख्य कार्यायलय म्हणजेच शिवसेनाभवनासमोर बॅनर्स लावले आहेत. या बॅनर्सवर छत्रपतींच्या अपमानाचा बदला घेणाऱ्या आमदारांचे आभार, असे लिहिण्यात आले आहे. या बॅनरबाजीच्या माध्यमातून शिवसेना तसेच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

संभाजीराजे काय म्हणाले?

या बॅनरबाजीनंतर संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. खुन्नस म्हणून कार्यालयासमोर अशी काही कृती करणे माझ्या तत्त्वात बसत नाही, असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले आहेत. “समर्थकांनी माझ्या प्रेमापोटी जे फ्लेक्स लावले, त्याच्या प्रेमाचा मी आदरच करतो. मात्र कोणत्याही पक्षाबद्दल खुन्नस म्हणून त्यांच्या कार्यालयासमोर अशी काही कृती करणे माझ्या तत्त्वात बसत नाही. राजकारणात येणार असलो तरी ‘स्वराज्य’ला तत्त्वांची बैठक असेल,” असे संभाजीराजे छत्रपती ट्विटच्या माध्यमातून म्हणाले आहेत.

संभाजीराजेंचे समर्थक शिवसेनेवर नाराज का आहेत?

संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभेची निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त करत विजयासाठी पाठिंबा द्यावा अशी मागणी शिवसेनेकडे केली होती. मात्र संभाजीराजे यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला तरच आम्ही पाठिंबा देऊ अशी अट शिवसेनेने घातली होती. ही अट अमान्य करत संभाजीराजे छत्रपती यांनी या निवडणुकीतून माघार घेतली. त्यानंतर शिवसेनेने शिवसेनेचे कार्यकर्ते तथा कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांना उमेदवारी दिली होती. याच कारणामुळे संभाजीराजेंचे समर्थक शिवसेनेवर नाराज आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sambhaji raje chhatrapati comment on banners in front of shiv sena bhavan after rajya sabha election 2022 prd