माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी ‘हर हर महादेव’ आणि ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या मराठी चित्रपटांना विरोध केला आहे. या चित्रपटांमध्ये इतिहासाची मोडतोड करण्यात आली आहे. तसेच या चित्रपटांतील मावळ्यांची वेशभूषादेखील ऐतिहासिक संदर्भांना धरून नाही, असा दावा संभाजीराजे छत्रपती यांनी केला आहे. दरम्यान, इतिहासाची मोडतोड करून चित्रपट दाखवले जात असतील, तर आम्ही खपवून घेणार नाही, असा थेट इशारा संभाजी छत्रपती यांनी दिला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
हेही वाचा >>> “लातूरकर, नांदेडकर फडणवीसांच्या मांडीवर बसायला तयार,” प्रकाश आंबेडकरांची टीका; नाना पटोले म्हणाले “भाजपाचे प्रवक्ते…”
सिनॅमेटिक लिबर्टी म्हणून चित्रपटांत काहीही दाखवले जात आहे. वासी बेंद्रे तसेच इतर लेखकांची पुस्तकं तसेच भालजी पेंढाकर यांचे चित्रपट पाहिले तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास काय आहे, हे समजते, असे संभाजीराजे छत्रपती म्हणाले. तसेच या चित्रपटांना विरोध करत आहात तर आगामी लढाई कशी लढाल? या प्रश्नाचे उत्तर देताना, ‘मी वेडात मराठे वीर दौडले सात’ तसेच ‘हर हर महादेव’ हे चित्रपट पाहणार आहे. हे सिनेमे पाहायलाच हवेत. मी तर आमरण उपोषण करणारा माणूस आहे. माझा जीव धोक्यात घालून उपोषणं केलेली आहेत. चित्रपटगृहांच्या मालकांना आम्ही आवाहन करू. तसेच सेन्सॉर बोर्डालादेखील आम्ही त्यांनी या चित्रपटांना परवानगी कशी दिली, याबाबत विचारणा करणारे पत्र लिहू,’ अशी भूमिका संभाजीराजे छत्रपती यांनी मांडली.
“इतिहासाचे सिनेमा निघत असून, ही कौतुकाची बाब आहे. राजस्थानचे महाराणा प्रताप घराणे सोडले, तर इतिहासाच्या संदर्भात चित्रपट निघाले आहेत. ते चित्रपट इतिहासाची मोडतोड करुन काढले जात आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांबाबतच्या चित्रपटांबद्दल हे चालणार नाही,” असा इशारा संभाजीराजे छत्रपती यांनी दिला आहे.