संभाजीराजे छत्रपती यांच्या राज्यसभा निवडणुकीसाठीच्या अपक्ष उमेदवारीवरून राज्यातलं राजकारण तापलेलं असतानाच त्यांचे वडील शाहू महाराज यांनी केलेल्या खळबळजनक दाव्यामुळे आता संभाजीराजे आणि शाहू महाराज यांच्यातच मतभेद असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. संभाजीराजेंची व्यक्तिगत उमेदवारी नाकारली गेल्यामुळे घराण्याचा अपमान वगैरे झाल्याचा प्रश्नच येत नाही, अशी प्रतिक्रिया शाहू महाराज यांनी दिल्यामुळे त्यावरून आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यासंदर्भात वडिलांची प्रतिक्रिया आल्यानंतर आता संभाजीराजे छत्रपती यांनी त्यावर सूचक शब्दांत ट्वीट केलं आहे.

काय म्हणाले शाहू महाराज?

शाहू महाराज यांनी प्रसारमाध्यमांकडे दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये संभाजीराजेंसोबत उमेदवारीसोबत विचारविनिमय झाला नसल्याचं म्हटलं आहे. “त्यांची व्यक्तिगतरित्या उमेदवारी नाकारली आहे. आमच्यात काही विचारविनिमय झाला असता किंवा मी त्यांना संमती दिली असती किंवा नसती. काही झालं असतं. पण तसा काही विचारविनिमय झाला नसल्यामुळे घराण्याचा अपमान झाल्याचा काही प्रश्न येत नाही. हे राजकारण आहे. माझ्यापर्यंत आले असते तर वेगळा विषय असता. पण तसं काही झालं नाही”, असं शाहू महाराज म्हणाले आहेत.

तसेच, “राज्यसभेवर जाण्याचे जानेवारीपासून त्यांचे प्रयत्न सुरु झाले होते. त्यांची काय योजना होती याची काही कल्पना नव्हती. त्यावेळी देखील चर्चा नाही झाली. पण तिकडे जात असल्याचा निर्णय त्यांनी मला सांगितला. त्याला मी विरोध केला होता पण लोकशाही असल्याने ते कुठेही जाऊ शकतात. ड्राफ्ट म्हणजे कच्चा मसुदा होता. पण ते फायनल झालं असतं आणि मग विचार बदलला असता तर म्हणता येईल की शब्द फिरवला. पण वाटाघाटी चालू असताना, ड्राफ्ट स्टेजमध्ये असल्याने नक्की काही ठरलेलंच नव्हतं”, असं देखील शाहू महाराज म्हणाले आहेत.

“मला फार वाईट वाटतंय, मुख्यमंत्र्यांनी…”, संभाजीराजे छत्रपतींच्या तीव्र भावना; म्हणाले, “माझी ताकद ४२ आमदार नाही!”

वडिलांच्या भूमिकेवर संभाजीराजेंची पहिली प्रतिक्रिया

दरम्यान, यावरून मोठी राजकीय चर्चा सुरू झालेली असतानाच संभाजीराजे छत्रपती यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. “छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरून पत्रकार परिषदेत मी सत्य तेच बोललो आहे. माझ्या वडिलांचा मी आदरच करतो. ते जे बोलले, त्यावर मी काही बोलू इच्छित नाही”, असं संभाजीराजे छत्रपती आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.

संभाजीराजेंनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उमेदवारीबाबत दिलेला शब्द मोडल्याची टीका केली होती. तसेच, आता आपण राज्यसभा उमेदवारी लढवणार नसल्याचं देखील जाहीर केलं होतं. संभाजीराजेंना पाठिंबा नाकारल्यानंतर शिवसेनेकडून कोल्हापुरातल्याच संजय पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या घटनाक्रमावरून शिवसेना आणि संभाजीराजे यांच्यात वेगवेगळे दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत.

Story img Loader