गेल्या काही दिवसांपासून ‘हर हर महादेव’ चित्रपटावरून चांगलाच वाद सुरू आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी या चित्रपटाला विरोध केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते तथा माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीदेखील आक्रमक भूमिका घेत ठाण्यात या चित्रपटाचे काही शो बंद पाडले होते. दरम्यान, हा चित्रपट आता टीव्हीवर प्रदर्शित होत असल्याने छत्रपती संभाजीराजे यांनी आक्षेप घेतला आहे. जर हा चित्रपट टीव्हीवर प्रदर्शित झाला, तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा त्यांनी ‘झी स्टुडिओ’ला दिला आहे. तसेच त्यांनी ‘झी स्टुडिओ’च्या प्रमुखांना पत्रदेखील लिहिले आहे. ट्वीट करत त्यांनी यासंदर्भातील माहिती दिली.
हेही वाचा – “आमच्याकडे एक ‘सुशी ताई’ आहेत ज्यांच्या…”, मनसे आमदार राजू पाटलांची सुषमा अंधारेंवर बोचरी टीका
काय म्हणाले संभाजीराजे?
‘हर हर महादेव’ हा चित्रपट सिनेमागृहात बंद पाडल्यानंतर आता १८ डिसेंबर रोजी ‘झी मराठी’ या वाहिनीवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. इतिहासाचे चुकीच्या पद्धतीने सादरीकरण करण्यात आलेला व तमाम शिवभक्तांच्या भावना दुखावणारा हा चित्रपट टीव्हीवर प्रदर्शित करू नये, याबाबत स्वराज्य संघटनेने ‘झी स्टुडिओ’ला पत्र लिहून सूचित केले आहे. जर या सूचनेकडे कानाडोळा करून हा चित्रपट टीव्हीवर प्रदर्शित केल्यास होणाऱ्या गंभीर परिणामांना ‘झी स्टुडिओ’ जबाबदार असेल, असा इशारा संभाजीराजे छत्रपती यांनी दिला आहे.
हेही वाचा – “पक्षाने आदेश द्यावा, मी बेळगावात घुसून…”; महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाबाबतचं शहाजी बापूंचं विधान चर्चेत!
‘झी स्टुडिओ’ला लिहिलेल्या पत्रात नेमकं काय म्हटलय?
‘हर हर महादेव’ चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे चुकीच्या पद्धतीने सादरीकरण केले आहे. त्यामुळे या चित्रपटाबाबत संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. राज्यात अनेक ठिकाणी या चित्रपटाचे शो बंद पाडण्यात आले होते. या चित्रपटामुळे तमाम शिवभक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. तरीदेखील तुम्ही ‘झी मराठी’ या वाहिनीच्या माध्यमातून टीव्हीवर प्रदर्शित करत आहात. शिवभक्तांच्या भावनांशी असा खेळ करणे योग्य नाही. त्यामुळे हा चित्रपट तुम्ही टीव्हीवर प्रदर्शित करू नये, असे स्वराज्य संघटना सूचित करत आहे. या सूचनेकडे कानाडोळा करून ‘हर हर महादेव’ चित्रपट टिव्हीवर प्रदर्शित केल्यास होणाऱ्या गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, त्यासाठी पूर्णता तुम्ही जबाबदार असाल, असे संभाजीराजेंनी ‘झी स्टुडिओ’ला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.