मराठा आरक्षणासह समाजाच्या इतर मागण्यांसाठी उपोषण करण्याची घोषणा संभाजीराजे छत्रपतींनी केली आहे. २६ फेब्रुवारीपासून संभाजीराजे बेमुदत उपोषण करणार आहेत, त्यांनी यांसदर्भात पत्रकार परिषद घेत माहिती दिली. करोनामुळे मराठा आरक्षणाबद्दल कोणतीही भूमिका जाहीर केली नव्हती, मात्र आता आपण मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत उपोषण करणार आहे, असं संभाजीराजेंनी सांगितलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यावेळी बोलताना ते म्हणाले की, “आम्ही कुठल्याही पक्षाच्या विरोधात किंवा कोणताही राजकीय अजेंडा घेऊन आलेलो नाही. मराठा समाजाला न्याय मिळावा, एवढीच आमची मागणी आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा वंशज म्हणून मी मराठा समाजावर अन्याय होतो, या कारणाने २००७पासून महाराष्ट्र पिंजून काढतोय. ज्या शिवाजी महाराजांनी १८ पगड जातीचं नेतृत्व केलं, ज्या शाहू महाराजांनी बहुजन समाजाला पहिलं आरक्षण दिलं, त्यामध्ये अनुसूचित जाती जमातीसह मराठा समाजाचा समावेश होता. त्याच समाजासाठी आज माझा लढा आहे,” असं ते म्हणाले.

“मी मराठा समाजाचं नेतृत्व करण्यासाठी इथं आलेलो नाही, तर मी त्यांचा शिपाई म्हणून इथं आलो आहे. जस्टीस गायकवाडांचा अहवाल हा अवैध ठरला आहे. त्यामुळे आपला कायदा मोडीत निघाला, आपण सामाजिक मागास राहिलेलो नाही,” असं त्यांनी मराठा समाजाला सांगितलं. पुढे ते म्हणाले. “९ ऑगस्ट २०१७ रोजी मी मराठा आंदोलनाच्या व्यासपीठावर जाऊन नम्रता दाखवली. मी बोलल्यानंतर ५० लाख लोक परत गेले. तसाच निर्णय सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा दिला. तो सर्वोच्च निर्णय असल्याने आपण त्यांना आव्हान देऊ शकत नाही. त्यावेळीही मी सामंजस्यपणाने भूमिका घेतली आणि करोना काळात उद्रेक न करण्याचा निर्णय घेतला,” असं ते म्हणाले.  

संभाजीराजे म्हणाले, “मराठा समाज देखील वंचित घटक आहे. त्यासाठीच आरक्षणाची भूमिका घेतली. मी मराठा असल्याने मराठा आरक्षणासाठी लढत नाही. तर, इतक्या वेळा आंदोलन करूनही कोणतीच मागणी पूर्ण झालेली  नाही. मी आत्तापर्यंत आक्रमक होतो, पण आता मी उद्विग्न झालो आहे. मला टोकाची भूमिका न घेण्यास सांगण्यात आलं. पण सरकार काहीच हालचाल करत नाही. त्यामुळे २६ फेब्रुवारीला मी स्वतः बेमुदत उपोषणाला मुंबईतील आझाद मैदानात बसणार आहे,” असं त्यांनी सांगितलं

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sambhaji raje chhatrapati will do hunger strike for maratha reservation hrc