Sambhajiraje Chhatrapati & Shivendraraje Bhosale Meet: राज्यसभा निवडणुकीच्या घडामोडीवरून राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. श्रीमंत शाहू महाराजांनी छत्रपती संभाजीराजेंवर टीका करत शिवसेनेची बाजू घेतल्याने नवा वाद सुरु झाला आहे. त्यातच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कोल्हापुरात शाहू महाराजांची भेट घेतली तर त्याचवेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. यादरम्यान आता आणखी एका भेटीमुळे चर्चांना उधाण आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संभाजीराजे छत्रपती आणि आणि शिवेंद्रसिंहराजे यांची साताऱ्यात भेट झाली आहे. राष्ट्रीय महामार्गावर खिंडवाडी येथे ही धावती भेट झाली. यामुळे भविष्यात दोन्ही राजे एकत्र येऊन राज्याच्या राजकारणात लक्ष घालणार असल्याची चर्चा रंगली आहे.

मोठी घडामोड! शाहू महाराजांनी बाजू घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंनी फोनवरुन केली चर्चा; आश्वासन देत म्हणाले “मी तुम्हाला…”

“काही लोकांनी महाराजांना स्क्रिप्ट तयार करुन…”; शाहू महाराजांच्या दाव्यानंतर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

मात्र दोन्ही राजेंच्या भेटीने चर्चांना उधाण आलं आहे. काही दिवसांपूर्वी संभाजीराजेंचा गेम केला असल्याचं वक्तव्य आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी केलं होतं. यावर संजय राऊत आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी शिवेंद्रसिंहराजेंना प्रत्युत्तर देत आगीत तेल ओतू नये अशी टीका केली होती.

शिवसेनेच्या डोक्यावर टांगती तलवार

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपाने केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल, माजी कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे आणि कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांना उमेदवारी जाहीर केली. डॉ. बोंडे यांना उमेदवारी देऊन भाजपाने राजकीय आरक्षण रद्द झाल्याने संतप्त भावना असलेल्या इतर मागासवर्ग समाजाला (ओबीसी) आपलेसे करण्याचा प्रयत्न केला आहे.

भाजपच्या तिसऱ्या उमेदवारामुळे रंगतच ; शिवसेनेची अडचण; पीयूष गोयल, अनिल बोंडे, धनंजय महाडिक यांना उमेदवारी

तिसऱ्या जागेसाठी भाजपाने रात्री उशिरा कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या नावाची घोषणा केली. कोल्हापूरचे संभाजीराजे यांना पाठिंबा देण्यास नकार देऊन शिवसेनेने कोल्हापूरच्या संजय पवार यांना उमेदवारी जाहीर केली. म्हणूनच भाजपानेही कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांना तिसरे उमेदवार म्हणून रिंगणात उतरविले आहे. विजयासाठी पहिल्या पसंतीच्या ४१.०१ मतांची आवश्यकता आहे. भाजपचे १०६ आमदार असून, पक्षाकडे २२ अतिरिक्त मते आहेत.

उद्धव ठाकरेंची शाहू महाराजांसोबत फोनवरुन चर्चा

संजय राऊत रविवारी श्रीमंत शाहू महाराजांच्या भेटीसाठी न्यू पॅलेसमध्ये पोहोचले होते. यावेळी त्यांच्यासोबत संभाजीराजेंच्या जागी उमेदवारी मिळालेले संजय पवारदेखील उपस्थित होते. यावेळी फोनवरुन उद्धव ठाकरे आणि शाहू महाराजांमध्ये बोलणं झालं.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, “मी महाराजांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो. मी बऱ्याच वर्षांनी आज कोल्हापुरात आलो. उद्धव ठाकरेंनी सकाळी मला फोन करुन कोल्हापुरात आहात तर महाराजांचे आशीर्वाद घ्या आणि मलाही त्यांच्याशी बोलायचं आहे असं सांगितलं. ठाकरे कुटुंब आणि महाराजांचं एक नातं आहे. याठिकाणी उद्धव ठाकरे, बाळासाहेब आले होते. उद्धव ठाकरेंनी महाराजांना फोनवर मी स्वत: कोल्हापुरात येईन असं सांगितलं आहे. महाराष्ट्रातील आमच्या सामाजिक कार्यात आपल्या शुभेच्छा, आशीर्वाद राहू देत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली”.

संभाजीराजेंचे निर्णय व्यक्तिगत; श्रीमंत शाहू महाराजांचे स्पष्टीकरण

संभाजीराजे छत्रपती हे राजकारणात घेत असलेले सर्व निर्णय हे त्यांचे वैयक्तिक स्वरूपाचे आहेत. याचा छत्रपती घराण्याशी काहीही संबंध नाही. तरीही ते अशाप्रकारे चुकीचा संबंध जोडत असतील तर ते चुकीचे असल्याचा निर्वाळा श्रीमंत शाहू महाराज यांनी दिला आहे. तसंच शिवसेना आणि संभाजीराजे यांच्यात काही मुद्दय़ावर राज्यसभेच्या उमेदवारीबाबत ठरले होते. यातूनच ही उमेदवारी काही कारणांनी ते देऊ शकले नसतील तर त्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शब्द न पाळल्याची टीका होणेदेखील चुकीचे असल्याचे मत शाहू महाराजांनी व्यक्त केलं आहे.

सत्यच बोललो – संभाजीराजेंचा पवित्रा

राज्यसभा निवडणुकीच्या घडामोडीवरून श्रीमंत शाहू महाराज यांचे विधान चर्चेत असताना संभाजीराजे छत्रपती यांनी यावर समाज माध्यमातून प्रतिक्रिया नोंदवताना ‘ मी सत्यच बोललो आहे’ असे म्हणत आपले विधान खरे असल्याचा दावा केला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sambhajiraje chhatrapati and shivendraraje bhosale meets in satara sgy