बदलापूरच्या आदर्श शाळेतील कर्मचाऱ्याने दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर पालकांकडून आदर्श शाळेबाहेर आंदोलन सुरू आहे. तसेच या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त होऊ लागला आहे. याबाबत माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. सरकार कुणाचंही असो महिलांच्या सुरक्षेची हमी देण्यास असमर्थ ठरत असल्याचे ते म्हणाले. एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
नेमकं काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती?
“कोलकाता येथील घटनेतील सर्व आरोपी अद्याप पकडले गेले नाहीत. उरण येथील घटना ताजी आहे. याशिवाय नुकतीच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दहावीत ९६ टक्के मिळविलेल्या एका १६ वर्षांच्या मुलीने विकृत मेकॅनिक मुलाच्या अघोरी त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे. अशातच आता बदलापूर येथील शाळेत चिमुकल्यांवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. देशभरात सरकार कुणाचंही असो महिलांना सुरक्षिततेची हमी देण्यास कमी पडत आहे”, अशी प्रतिक्रिया संभाजीराजे छत्रपती यांनी दिली.
“देशभरात आज विकृती वाढीस लागली आहे. आरोपींना वेळीच पकडले जात नाही. पकडले तरी कठोर शिक्षा होत नाही. कित्येक तर निर्दोष सुटून जातात. देशात कायद्याचा धाक राहिला नाही. त्यामुळे अशा गैरप्रकारांना रोखण्यासाठी लोकांनीच कठोर भूमिका घेतली, तर सरकारने आणि समाजातील बेगडी मानवतावाद्यांनी लोकांना दोष देऊ नये”, असा इशाराही त्यांनी दिला.
© IE Online Media Services (P) Ltd