Sambhajiraje : ऐतिहासिक संदर्भ नसलेल्या, पुरावे नसलेल्या वाघ्या कुत्र्याची समाधी रायगड किल्ल्यावरुन हटवण्यात यावी अशी मागणी माजी खासदार आणि रायगड विकास प्राधिकारणाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. तसं एक पत्रच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं आहे.
संभाजीराजेंनी काय पत्र लिहिलं आहे?
हिंदवी स्वराज्याची राजधानी दुर्गराज रायगड येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत कथित वाघ्या कुत्र्याची समाधी म्हणून एक संरचना काही दशकांपूर्वी उभारण्यात आलेली आहे. सदर वाघ्या कुत्रा नामक पात्राचा शिवकालीन इतिहासात कोणत्याही प्रकारचा उल्लेख अथवा संदर्भ मिळत नाही. भारतीय पुरातत्व विभागाने देखील सदर समाधी संरचना व वाघ्या कुत्र्याचे ऐतिहासिक महत्त्व यांबाबत त्यांच्याकडे कोणतीही ऐतिहासिक माहिती व पुरावे उपलब्ध नसल्याची स्पष्टोक्ती दिलेली आहे.
कपोलकल्पित समाधी उभारण्यात आली हे महाराष्ट्राचं दुर्दैव
समस्त भारतवासीयांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत एका कपोलकल्पित कुत्र्याची समाधी व पुतळा उभारणे हे महाराष्ट्राचे दुर्दैव, श्रद्धेची कुचेष्टा व महान युगप्रवर्तक श्री छत्रपती शिवाजी महाराजांची घोर प्रतारणा आहे. कोणतीही ऐतिहासिक पार्श्वभूमी व महत्त्व नसलेली सदरील वाघ्या कुत्रा समाधी नामक संरचना हे दुर्गराज रायगडवरील अतिक्रमण असून राज्य शासनाच्या धोरणानुसार दि. ३१ मे २०२५ अखेरीपर्यंत सदरील अतिक्रमण श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळावरून व दुर्गराज रायगड वरून कायमस्वरूपी हटविण्यात यावे, याकरिता मुख्यमंत्री महोदयांकडे पत्र लिहून मागणी केली.

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

वाघ्या कुत्रा समाधी संरचनेस १०० वर्षे पूर्ण होण्याआधी ती हटवा-संभाजीराजे

भारतीय पुरातत्व विभागाच्या धोरणानुसार १०० वर्षांहून अधिक पुरातन असलेली संरचना संरक्षित स्मारक म्हणून गणली जाते. त्यामुळे वाघ्या कुत्रा समाधी संरचनेस १०० वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच विहित कालमर्यादेत ही संरचना हटविणे अत्यावश्यक आहे.

संभाजी राजे छत्रपती यांची कुत्र्याची समाधी हटवण्यासंदर्भातली पोस्ट (सौजन्य-संभाजीराजे छत्रपती, फेसबुक पेज)

वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याची शिवप्रेमींचीही मागणी

रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या मागे कथित वाघ्या कुत्र्याची समाधी बांधण्यात आली आहे. या गोष्टीला कोणताही ऐतिहासिक आधार नसल्याचं सांगत शिवभक्तांनी त्याला अनेकदा विरोध केला आहे. आता संभाजीराजेंनीही पुन्हा तीच मागणी केली आहे. वाघ्या कुत्र्याची समाधी ही अलिकडच्या काळात बांधण्यात आली असून ते रायगडवरील अतिक्रमण असल्याचं संभाजीराजेंनी म्हटलं आहे. ३१ मे पर्यंत सरकारने ती कपोलकल्पित समाधी हटवावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. आता या मागणीचा विचार सरकारकडून केला जाणार का? तसंच ही समाधी हटवली जाणार का? हे प्रश्न तूर्तास तरी अनुत्तरीत आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sambhajiraje chhatrapati demand about waghya dog statue raigad fort has to remove letter cm devendra fadnavis scj