छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज संभाजीराजे छत्रपती यांनी महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी स्वतंत्र मंत्रालय हवं, अशी मागणी राज्यसरकारकडे केली आहे. राज्यातील अनेक गडकिल्ल्यांची अवस्था अत्यंत जीर्ण स्वरुपाची झाली असून पावसाळ्यात तटबंदी ढासळण्याचे प्रकार घडतात. त्यानंतर तात्पुरत्या स्वरुपाची डागडुजी केली जाते. पण असे प्रकार घडणे नेहमीचेच झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी स्वतंत्र मंत्रालय किंवा महामंडळ असावं, अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विटरद्वारे केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं की, “महाराष्ट्राच्या अस्मितेचं प्रतीक असणारे शिवाजी महाराजांचे गडकोट आज अत्यंत दुरावस्थेत आहेत. दिवसेंदिवस त्यांची अधिकच दुरावस्था होत आहे. पन्हाळा गडाची तटबंदी अथवा बुरुज ढासळणं, हे तर नेहमीचेच झालं आहे. हा ऐतिहासिक वारसा भावी पिढ्यांपर्यंत पोहोचवायचा असेल, तर त्याच्या संवर्धनासाठी दीर्घकालीन व भरीव योजना राबवणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे राज्यातील गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी स्वंतत्र मंत्रालयाची अथवा किमान महामंडळाची निर्मिती करावी” अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे.

“इतक्या वर्षांच्या अनुभवातून एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे केवळ तात्पुरते उपाय करून आणि जुजबी डागडुजी करून गडकोटांचे संवर्धन होणार नाही. त्यामुळे विद्यमान राज्य शासनाने हा विषय गांभीर्याने घेऊन यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, ही एक दुर्गप्रेमी म्हणून मी मागणी करत आहे” असंही ते म्हणाले.

हेही वाचा- “मला राज्यसभेची उमेदवारी दिली असती तर…,” एकनाथ शिंदे प्रकरणावरुन संभाजीराजे छत्रपतींचा शिवसेनेला टोला

पुढे त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं की, “गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी ठोस व दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी मी प्रयत्न करत आहे. केंद्रीय पुरातत्त्व विभागाकडे पाठपुरावा करून विजयदुर्ग तटबंदीचे काम सुरू करण्यास मंजुरी आणली होती. विशाळगडाच्या तटबंदी संवर्धनाचे काम सुरू केले आहे. रांगणा किल्ल्यासाठी भरीव निधी आणला आहे. रायगड प्राधिकरणच्या धर्तीवर केंद्राच्या ताब्यात असणारे सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, कुलाबा, शिवनेरी यांसारखे किमान १० महत्त्वाचे किल्ले सामंजस्य कराराद्वारे राज्य सरकारकडे देण्यात यावेत, यासाठी सदैव प्रयत्न केले.”