माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी त्यांच्या वडिलांच्या वाढदिवसानिमित्त एक भावनिक पत्र लिहिलं. या पत्रात त्यांनी वडिलांविषयी भरभरून आठवणी सांगितल्या. “बाबा आणि माझे नाते एका शब्दात सांगायचे झाले तर एकच शब्द येतो, तो म्हणजे ‘Awe’ म्हणजे आदरयुक्त भिती,” असं संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं. त्यांनी शनिवारी (७ जानेवारी) एक फेसबूक पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या.

या पोस्टमध्ये संभाजीराजे छत्रपती म्हणाले, “आदरणीय बाबा, ‘महाराज’. श्री शाहू छत्रपती महाराजांचा आज अमृत महोत्सवी वाढदिवस. मला आदर्शवत आणि खऱ्या अर्थाने माझे मार्गदर्शक असलेल्या बाबांविषयी माझ्या भावना या ठिकाणी व्यक्त करत आहे. छत्रपती घराण्याची थोर परंपरा जपण्यासाठी अहोरात्र दक्ष असणारे महाराज, बाबा म्हणूनही तितकेच संवेदनशील आहेत.”

tula shikvin changalach dhada adhipati defends mother akshara feels helpless
भुवनेश्वरीचा डाव यशस्वी! अक्षरा घर सोडून जाणार? अधिपतीने धरले आईचे पाय; म्हणाला, “आमच्या आईसाहेब…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Sanjay Raut Brother Post News
Sanjay Raut Brother : संजय राऊत यांच्या सख्ख्या भावाची पोस्ट चर्चेत; डिलिट करत म्हणाले, “मी..”
Sane Guruji , book Sane Guruji Jeevan Gatha,
‘साने गुरुजींची जीवनगाथा’ आता ‘श्रवणीय’
Nana Patole
Nana Patole : “उत्तमराव जानकरांसह आम्ही खूप लोक राजीनामा द्यायला तयार, पण…”; नाना पटोलेंचं मारकडवाडीत मोठं विधान
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका
Sudhir Mungantiwar On Karnataka
Sudhir Mungantiwar : “कर्नाटक सरकारला याचा हिशेब द्यावा लागेल”; सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा, कारण काय?
suraj chavan meet dcm ajit pawar
“देवमाणूस आहेत दादा…”, अजित पवार उपमुख्यमंत्री होताच सूरज चव्हाण पोहोचला मंत्रालयात! नव्या घराबद्दल म्हणाला…

“बाबांनी लहानपणापासून आम्हाला आमच्या जबाबदारीची जाणीव करून दिली”

“लहानपणापासून त्यांनी आम्हाला आमच्या जबाबदारीची जाणीव करून दिली. राजघराण्यात जन्माला आल्यामुळे समाजात जो मानसन्मान किंवा विशेष वागणूक मिळते, त्यापासून त्यांनी आम्हाला कटाक्षाने लांब ठेवले. लोकांमध्ये मिसळल्याशिवाय त्यांची सुख-दुःखे समजणार नाहीत हा त्यांचा उद्देश असायचा,” असं संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितलं.

“…तेव्हा महाराजांच्या चेहऱ्यावरची काळजी स्पष्ट जाणवायची”

संभाजीराजे पुढे म्हणाले, “बाबांनी आमच्यावर उत्तम संस्कार व्हावेत याची काळजी नेहमी घेतली. शालेय शिक्षणासाठी मला राजकुमार कॉलेज राजकोट येथे पाठविण्यात आले होते. याच शाळेमध्ये राजर्षी शाहू छत्रपती महाराजांनी शिक्षण घेतले होते. कोल्हापूरला सुट्टीला आल्यानंतर, बाबा सुट्टी संपल्यावर मला सोडायला दरवेळी राजकोटला यायचे. शाळा जसजशी जवळ यायची तसतसे माझ्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलत असत आणि महाराजांच्या चेहऱ्यावरची काळजी व त्यांच्या मनाची घालमेल स्पष्ट जाणवायची.”

“बाबा मला मिठी मारायचे, तेव्हा डोळ्यातून अश्रू यायचे”

“शाळेच्या गेटवर बाबा मला मिठी मारायचे, तेव्हा डोळ्यातून अश्रू यायचे. राज्यसभेवर खासदार म्हणून माझी निवड झाली आणि नवीन राजवाड्याच्या पोर्चमध्ये पहिल्यांदा बाबांची भेट झाली तेव्हा मारलेली मिठी, डोळ्यातून आलेले अश्रू यातील प्रेम, जिव्हाळा, काळजी तितकीच होती, जितकी राजकुमार कॉलेजच्या गेटवर मारलेल्या मिठीत होती,” असंही संभाजीराजेंनी नमूद केलं.

संभाजीराजे पत्रात नेमकं काय म्हणाले?

संभाजीराजेंनी वडिलांना दीर्घ पत्र लिहिले. त्यात त्यांनी अनेक आठवणी आणि प्रसंगांचा उल्लेख केला. या पत्रात ते नेमके काय ते खालीलप्रमाणे,

“बाबांनी नेहमीच व्यक्तीस्वातंत्र्याचा आदर केला. माझ्या लग्नावेळी वधू निवडण्याचे स्वातंत्र्य दिले. लग्न झाले त्यावेळेची आठवण सांगताना संयोगिताराजे सांगतात, “लग्न झाले तेव्हा मी खूपच लहान होते, पण बाबांनी मला खूप समजावून घेतले. मी आपणास बाबा म्हणू का ? असे विचारले असता, माझी दोन्ही मुलं मला बाबा म्हणतात, तुम्हीपण मला बाबाच म्हणा, असे बाबांनी सांगितले. किती प्रेम, किती आपुलकी, बाबांनी खूप लाड केले. बाबांनी मला नेहमीच मुलीसारखे वागवले.”

“तारा कमांडो फोर्सच्या बियासकुंड ट्रेकला बाबांबरोबर संयोगिताराजे गेल्या असता, तिथला एक प्रसंग इथे सांगण्यासारखा आहे. रात्रीच्या वेळी कँपवर असताना, अचानकपणे वादळ व जोराचा पाऊस सुरू झाला. अनेकांच्या टेंटमध्ये पाणी येवू लागले. बाबांना काळजी वाटू लागली. संयोगिताराजेंना शोधत बाबा स्वतः पावसात कंदील घेऊन आले. सर्व सुखरूप असल्याची खात्री करून पुन्हा आपल्या टेंटमध्ये गेले. कोणत्याही कामाचे सुक्ष्म नियोजन कसे करायचे, हे बाबांकडूनच शिकण्यासारखे आहे, असे संयोगिताराजे नेहमी म्हणत असतात.”

“चिरंजीव शहाजी लहान असताना बाबा व शहाजी अनेकवेळा कुशीरे ते जोतिबा ट्रेकला जात असत. घोडेस्वारी, व्यायाम, पोहणे यासाठी बाबा नेहमी शहाजींना प्रोत्साहन देत. शहाजी बाबांविषयी बोलताना म्हणतात, “आबांशी चर्चा करताना प्रत्येक विषयाचा पूर्ण अभ्यास करून जावे लागते. कोणत्याही गोष्टीचा खोलवर अभ्यास करून ते निर्णय घेत असतात. आबांना वाचनाची प्रचंड आवड आहे. त्यांचा व्यासंग मोठा आहे, त्यामुळे आबांचा विवेक कायम जागृत असतो. आबांचा हा गुण मला सदैव प्रेरणा देणारा आहे.”

“इतिहास हा बाबांचा आवडता विषय आहे, मेजर जनरल श्री शहाजी छत्रपती महाराजांप्रमाणेच त्यांनी इतिहास संशोधन मंडळास प्रोत्साहन देऊन मराठा इतिहास लेखन चळवळ पुढे चालू ठेवली. यातून अनेक ग्रंथांची निर्मिती झाली आहे.”

“राजर्षी शाहू छत्रपती महाराजांनी शैक्षणिक कार्यात केलेल्या कार्याचा वसा घेऊन सामान्य माणसाला गुणवत्तापूर्ण उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी बाबांनी छत्रपती शाहू विद्यालयाची स्थापना केली. इंग्रजी शाळेमध्ये मराठी भाषा सक्ती बाबांनी केली, कारण मातृभाषा अवगत असल्याशिवाय मातृभूमीशी नाळ जोडली जात नाही, असा त्यांचा ठाम विश्वास आहे.”

“साहसी वृत्ती समाजामध्ये रूजावी या उद्देशाने करवीर संस्थापिका महाराणी ताराबाई राणीसाहेब यांच्या नावाने तारा कमांडो फोर्सची (टीसीएफ) स्थापना केली आहे. बाबा क्रीडाप्रेमी आहेत. कुस्ती आणि फुटबॉल हे त्यांचे आवडते खेळ आहेत. आणि हेच संस्कार माझ्यात व शहाजींमध्ये आलेले आहेत. नवीन राजवाड्याच्या लाल आखाड्यातील माती अंगाला लागली. कुस्ती बरोबरच फुटबॉल, क्रिकेट, घोडेस्वारी, स्विमिंग याची आवड बाबांमुळे निर्माण झाली. बाबा स्वत: शाळेवरील टाकीत मला पोहायला शिकवायचे. यातूनच माझ्यात खेळाडूवृत्ती आणि धाडसीपणा निर्माण झाला.”

“बाबा, त्यांचे वडील मेजर जनरल श्री शहाजी छत्रपती महाराजांप्रमाणेच कडक शिस्तीचे आहेत. माझ्यात जी काही शिस्त आहे ती बाबांमुळेच आणि शांत स्वभाव आईंमुळे आहे. बाबांच्या अनेक छंदापैकी एक छंद म्हणजे प्रवास व पर्यटन. प्रवास व पर्यटनामुळे माणसाच्या ज्ञानाची क्षितिजे विस्तारतात. जगाचा परिचय होतो. वेगवेगळ्या संस्कृतींची ओळख होते. माणूस परिपूर्ण प्रवासामुळे होतो, असा बाबांचा पक्का विश्वास आहे. बाबांच्या प्रेरणेमुळेच मी, संयोगिताराजे व शहाजी अनेक स्थळी पर्यटन करून त्या ठिकाणचे भौगोलिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक महत्त्व जाणून घेत असतो.”

“बाबा शेतीकडे वेगळ्याच नजरेने पाहत असतात. बाबांच्या मते शेतीमध्ये वेळेला फार महत्व असते. वेळेचे गणित ज्या शेतकऱ्याला समजते तोच खरा शेतकरी. शेतीमध्ये नाविन्यपूर्ण प्रयोग करणे आणि नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग शेती व सर्व क्षेत्रात करावा यासाठी त्यांचा नेहमी आग्रह असतो. बाबांच्या जीवनात स्वच्छतेला व पर्यावरणाला महत्वाचे स्थान आहे. संयोगिताराजे व शहाजी यांना पर्यावरणाची आवड बाबांमुळेच लागली. बाबांनी आम्हाला सर्व कामांमध्ये परिपूर्ण बनवण्याचा नेहमीच प्रयत्न केला. त्यांच्यामुळेच कोणत्याही प्रसंगाला धैर्याने तोंड देण्याची वृत्ती माझ्यात निर्माण झाली. आमच्या जडणघडणीमध्ये त्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत असते.”

हेही वाचा : “…तेव्हा माझ्या डोळ्यातून अश्रू यायचे”, संभाजीराजे छत्रपतींचं वडिलांना भावनिक पत्र, म्हणाले, “बाबा मला…”

“माझ्या मनात बाबांविषयी नेहमी आदराचेच स्थान आहे. बाबांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभो, मनःशांती आणि आनंद मिळो हीच प्रार्थना! आम्ही आपल्या छत्रछायेखाली राहो आणि आपले मार्गदर्शन सतत राहो हीच सदिच्छा! आम्हा तिघांच्या अंत:करणात बाबांचे स्थान असीम आहे. बाबा आणि माझे नाते एका शब्दात सांगायचे झाले तर एकच शब्द येतो, तो म्हणजे ‘Awe’ (Respect with Reverential Fear) म्हणजे आदरयुक्त भिती!”

– संभाजी छत्रपती

Story img Loader