शिंदे-फडणवीस सरकारकडून राज्यातल्या कुणबी नोंदी असलेल्या मराठा कुटुंबांना कुणबी जातप्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे या मराठा कुटुंबांचा कुणबी जातप्रमाणपत्रासह ओबीसी आरक्षणात समावेश होणार आहे. परंतु, अन्न तथा नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यासह राज्यातल्या ओबीसी नेत्यांनी या आरक्षणास विरोध केला आहे. कुणबी जातप्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून छगन भुजबळ आणि मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.
एकीकडे मनोज जरांगे पाटील राज्यभर मोर्चे काढत आहेत, साखळी आंदोलनं करत आहेत. जरांगेंच्या सभांना लाखो लोकांची गर्दीदेखील जमत आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांना आव्हान देण्यासाठी छगन भुजबळ यांच्यासह राज्यातल्या ओबीसी नेत्यांनी जालन्यातल्या आंबड येथे ओबीसी एल्गार मोर्चा काढला. या मोर्चानंतर त्यांनी ओबीसी एल्गार सभा घेतली. या सभेत बोलताना छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटलांवर टीका केली. तसेच त्यांच्यावर गंभीर आरोपही केले.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाला दिल्या जाणाऱ्या कुणबी जातप्रमाणपत्रांविरोधात छगन भुजबळ आक्रमक झाले आहेत. ओबीसी एल्गार सभेत भुजबळांनी मनोज जरांगे यांचा एकेरी उल्लेख केला, तसेच जरांगेंबद्दल बोलताना भुजबळांची जीभ घसरल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे छगन भुजबळांवर टीका सुरू झाली आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीदेखील भुजबळांवर टीका केली आहे.
हे ही वाचा >> “तेव्हा लाज वाटली नाही का? तुम्ही महिला पोलिसांना…”, छगन भुजबळांचा मनोज जरांगेंसह आंदोलकांवर गंभीर आरोप
संभाजीराजे छत्रपतींनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. यात त्यांनी म्हटलं आहे की, छगन भुजबळ हे राज्याचे सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचे काम करत आहेत. सर्वसामान्य ओबीसी बांधवांचा मराठा समाजास कोणताही विरोध नसताना केवळ आपले राजकीय स्थान टिकवण्यासाठी दोन समाजांत नसलेली भांडणं लावण्याचं पाप ते करत आहेत. सरकारमधील एक मंत्री उघडपणे वेगळी भूमिका घेऊन जातीय तेढ निर्माण करत असेल तर सरकारची देखील हीच भूमिका आहे का? हे सरकारने स्पष्ट करावं. अन्यथा छगन भुजबळ यांची मंत्रीपदावरून हकालपट्टी करावी.