नृत्यांगणा गौतमी पाटीलचं नृत्य आणि तिच्या कार्यक्रमांवरुन होणारे वाद हे काही नवे नाहीत. गेल्या अनेक महिन्यांपासून वेगवेगळ्या कारणांनी ती सतत चर्चेत असते. अशातच गौतमीच्या आडनावावरुन नुकताच वाद निर्माण झाला आहे. गौतमीने पाटील हे आडनाव वापरु नये अशी भूमिका काही संघटनांनी घेतली होती. तर काही संघटनांनी तिला पाठिंबाही दर्शवला आहे. अशातच संभाजीराजे छत्रपती यांनी नृत्य आणि पाटील आडनावाच्या वादावर प्रतिक्रिया दिली. महिला संरक्षणाचा मुद्दा संभाजीराजे यांनी उपस्थित केला.
संभाजीराजे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांना संरक्षण दिलं. त्यामुळेच महिलांनाही स्वातंत्र्य आहे. महाराष्ट्र हे राज्य वेगळं आहे ते यामुळेच. म्हणूनच सर्वांनी गौतमी पाटील यांच्यामागे उभं राहिलं पाहिजे. कलाकाराला संरक्षण मिळालंच पाहिजे मी याच मताचा आहे. आता संभाजीराजे यांनी त्यांच्या या वक्तव्यावरून माघार घेतली आहे. त्यांनी नुकतंच एक ट्वीट करून म्हटलं आहे की, “अशा कलेला नको रे बाबा संरक्षण”.
गौतमी पाटीलवरील आपल्या वक्तव्याबद्दल स्पष्टीकरण देणारं एक ट्वीट संभाजीराजे यांनी केलं आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, काल एका पत्रकाराने एका महिलेचा ‘कलाकार’ असा उल्लेख करत, तिला त्रास व धमक्या दिल्या जात आहेत असं म्हणत मला प्रतिक्रिया विचारली. मला त्या व्यक्तीची व तिच्या कलेची काहीही माहिती नव्हती. पण महिला कलाकाराला धमक्या येणे हे चुकीचे समजून मी बोलून गेलो की कलाकारांना संरक्षण दिले पाहिजे. मात्र आज त्याचे नकारात्मक पडसाद उमटल्यावर आश्चर्याने या कलाकाराची ‘कला’ मी बघितली. आता असे वाटत आहे, महाराष्ट्राची संस्कृती बिघडवणाऱ्या अशा ‘कले’ला नको रे बाबा संरक्षण!
संभाजीराजेंनी आडनावारील वादावर आधी काय म्हटलं होतं?
संभाजीराजे यांनी म्हटलं होतं की, इतर राज्यांमध्ये जातीवर राजकारण चालतं. जाती विषमता कमी करायची असेल तर बहुजन समाजाच्या लोकांना न्याय दिला गेला पाहिजे. सध्या खालच्या पातळीचं राजकारण सुरु आहे. अशा राजकारणाला लोक कंटाळले आहेत. खोके-बोके, मांजर-कुत्रे ही भाषा ऐकण्यापेक्षा सुसंस्कृत महाराष्ट्र कसा घडावा? याविषयीची अपेक्षा लोक करत आहेत.