राज्यभरातील गडकोट प्रेमी आणि शिवभक्तांनी विशाळगडावरील अतिक्रमणांचा मुद्दा लावून धरला होता. आता यात राजकीय नेत्यांनीदेखील उडी घेतली आहे. दरम्यान, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी हा मुद्दा उचलून धरला आहे. तसेच त्यांनी विशाळगडावरील आतिक्रमणाविरोधात आक्रमक होत राज्य सरकारला अल्टीमेटम दिला आहे. संभाजीराजे यांनी १३ जुलै रोजी ‘चलो विशाळगड’ या मोहिमेची हाक दिली आहे. ते म्हणाले, मी हजारो शिवभक्तांबरोबर १३ जुलै रोजी विशाळगडावर जाणार आहे. तिथे जाऊन काय करणार ते मी आत्ताच सांगणार नाही. ते त्या दिवशी कळेल. तत्पूर्वी या अतिक्रमणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मनात काय आहे? ते आम्हाला जाणून घ्यायचं आहे.
संभाजीराजे छत्रपती म्हणाले, विशाळगडावरील अतिक्रमण हे मोठं संकट आहे. ते अतिक्रमण सरकारने हटवावं अशी आम्हा सर्व शिवभक्तांची आणि राज्यातील जनतेची मागणी आहे. ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज १२ जुलैच्या रात्री पन्हाळगडच्या वेढ्यातून सुटले आणि १३ जुलै रोजी विशाळगडावर गेले त्याच पद्धतीने आम्ही सर्व शिवभक्त १३ जुलै रोजी विशाळगडावर जाणार आहोत. आम्ही तिथे जाऊन काय करणार ते आत्ता सांगणार नाही. तिथलं अतिक्रमण हटवावं यासाठी आम्ही ‘चलो विशाळगड’ या मोहिमेची घोषणा केली आहे.
चलो विशाळगड मोहिमेची घोषणा करत संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना अल्टीमेटम दिला. संभाजीराजे कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी संभाजीराजे यांना विचारण्यात आलं की तुम्ही शिवभक्तांना या मोहिमेत सहभागी होण्याचा आदेश देणार आहात का? त्यावर संभाजीराजे म्हणाले, आता कोणी राजा-महाराजा नाही. त्यामुळे मी आदेश देत नाही. सर्व शिवभक्तांना केवळ आवाहन करत आहे की आम्ही सर्वजण विशाळगडावर जाणार आहोत. तुम्हीदेखील आमच्याबरोबर या. तत्पूर्वी मला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या मनात नेमकं काय आहे ते ऐकायचं आहे. विशाळगडावरील अतिक्रमण हटवलं जावं एवढीच आमची मागणी आहे.
हे ही वाचा >> संभाजीनगर पश्चिम विधानसभेसाठी भाजपाचे राजू शिंदे ठाकरे गटात? खैरेही इच्छूक? नाराजी व्यक्त करत म्हणाले…
संभाजीराजे म्हणाले, सर्व शिवभक्तांनी जास्तीत जास्त संख्येने आमच्याबरोबर एकत्र या. मी काही कोणाला आदेश देत नाही. आता राजे-महाराजे राहिलेले नाहीत. आदेश द्यायला मी काही राजा नाही. १९४७ च्या आधी छत्रपती आदेश देत होते. मी केवळ एक शिवभक्त म्हणून विशाळगडावर जातोय आणि इतर शिवभक्तांनी माझ्याबरोबर यावं असं मी आवाहन करत आहे.