Vishalgad Fort Sambhajiraje Chhatrapati Protest : विशाळगडावरील अतिक्रमण सरकारने हटवावं ही मागणी घेऊन माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आंदोलन सुरू केलं आहे. मात्र या आंदोलनामुळे कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि माजी पालकमंत्री सतेज पाटील यांनी संभाजीराजेंवर टीका केली आहे. “किल्ल्यावरील अतिक्रमणाच्या मुद्द्याबाबत संभाजीराजे यांची भूमिका योग्य आहे का हे त्यांनाच विचारा”, अशी टीका मुश्रीफ यांनी केली होती. “राजर्षी शाहू महाराजांच्या पुरोगामी जिल्ह्याला हे कृत्य शोभणारे नाही”, असंही मुश्रीफ म्हणाले होते. त्यावर संभाजीराजे यांनी “मुश्रीफांनी मला मला पुरोगामीत्व शिकवू नये”, असे प्रत्युत्तर दिलं होतं. दरम्यान, आपल्या आंदोलनाला यश आल्यानंतर संभाजीराजे यांनी आज (१६ जुलै) कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी त्यांनी मुश्रीफ आणि सतेज पाटलांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संभाजीराजे म्हणाले, “विशाळगडावर दोन-दोन तीन-तीन मजली अतिक्रमणं झाली होती. किल्ल्यावर अनेक शिवकालीन विहिरी आहेत. परंतु, काही लोकांनी त्या विहिरींवर जाळी टाकून, त्यावर सिमेंट-काँक्रीटचा ओटा बनवून त्यावर अतिक्रमणं केली होती. घरं, इमारती बांधल्या होत्या. आम्ही हे खपवून घेणार नाही.”

माजी खासदार म्हणाले, “काही नेते मंडळी खाली (गडाच्या पायथ्याशी) उभे राहून बोलतात. मला त्या लोकांना विचारायचं आहे की तुम्ही कधी गडावर गेलाय का? माझं या लोकांना आव्हान आहे, त्यांनी सांगावं, ते कधी गडावर गेले आहेत का? कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि माजी पालकमंत्री सतेज पाटील हे मला सांगतात की मी असं बोलू नये. संभाजीराजेंनी पुरोगामीत्व सोडलंय वगैरे गप्पा मारतात. परंतु, मला यांना विचारायचं आहे की तुम्ही कधी किल्ल्यावर गेला आहात का? तुमचा मला बोलण्याचा काय अधिकार आहे? तुम्ही किल्ल्यावर जा, काम करा आणि मग बोला.”

विशालगडावरील अतिक्रमणे हटवण्यास सुरुवात

हे ही वाचा >> Vishalgad : “हा खरंच शिवाजी महाराजांचा किल्ला आहे?” विशाळगडाची अवस्था पाहून संभाजीराजेंचा प्रश्न; म्हणाले, “स्थानिक लोकप्रतिनिधींनी…”

“तुम्ही विशाळगडासाठी काय केलंत?” संभाजीराजेंचा मुश्रीफांना प्रश्न

संभाजी राजे म्हणाले, माझ्यावर टीका करणाऱ्या लोकांना मला विचारायचं आहे तुम्ही आतापर्यंत किल्ल्यांसाठी काय कामं केली आहेत? मला मुश्रीफांना विचारायचं आहे की तुम्ही कधी विशाळगडासाठी निधी दिला आहे का? कोल्हापूरच्या बाहेर असलेल्या किल्ल्यांचं सोडा, किमान कोल्हापुरातील किल्ल्यांसाठी काही पैसे दिले आहेत का? मी ठामपणे सांगू शकतो, मी विशाळगडासाठी काम केलं आहे. कोल्हापुरातील इतर किल्ल्यांसाठी देखील कामं केली आहेत. पुरातत्व विभागाच्या माध्यमातून मी विशाळगडाला पाच कोटी रुपये मिळवून दिले होते. रामगडावर महाराणी ताराबाई यांचा वास्तव्य होतं, त्या किल्ल्यासाठी देखील मी पाच कोटी रुपये दिले होते. मला या लोकांना विचारायचं आहे की तुम्ही किल्ल्यांसाठी काय केलंय? तुम्ही किल्ल्यांना काही दिलंय का? मुळात माझ्यावर बोलण्यासाठी तुमच्याकडे अधिकार असायला हवा. एक माणूस किल्ल्यांसाठी काम करत असेल तर तुम्ही त्याला बदनाम करताय, हे योग्य नाही.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sambhajiraje chhatrapati slams hasan mushrif vishalgad fort encroachment asc
Show comments