सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भुजबळांवर फर्नांडिस कुटुंबाचं घर लाटल्याचा गंभीर आरोप केला. या प्रकरणी त्यांनी भुजबळांच्या घराबाहेर पत्रकार परिषद घेत मोठे खुलासे करणार असल्याचंही जाहीर केलं. मात्र, पोलिसांनी दमानियांना ताब्यात घेतलं. यानंतर आता समीर भुजबळांनी या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. ते रविवारी (१९ नोव्हेंबर) पत्रकार परिषदेत बोलत होते.
समीर भुजबळ म्हणाले, “अंजली दमानियांनी आमच्यावर अनेक उलटसुलट आरोप केले. त्यामुळे अनेक गुन्हे दाखल झाले. त्यावरूनच ईडीने आमच्या संपत्तीवर जप्तीची कारवाई केली. त्यात या संपत्तीचाही समावेश होता. याच दमानिया बाईंनी त्यांना पुढे करून आमच्याविरोधात गुन्हा दाखल केला. हे प्रकरण उच्च न्यायालयात गेलं. आमच्या विरोधात पुन्हा एकदा अंजली दमानियांनी डोरिंग फर्नांडीस यांच्या आडून वेगळं कटकारस्थान रचलं.”
“आजपर्यंत फर्नांडीस यांनी लवादाकडे अपिल केलं नाही”
“ते जेव्हा कोर्टात गेले तेव्हा आम्ही त्यांना विरोध केला नाही. आमच्या वकिलांनीही त्यांना विरोध केला नाही. न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल दिला, तर तो आम्ही मान्य करावा, अशी आमची भूमिका होती. मात्र, न्यायालयाने ही चुकीची याचिका असल्याचं म्हणत २२ मार्च २०१७ रोजी रद्द केली. तसेच याचिकाकर्त्यांना दिल्लीच्या लवादाकडे दाद मागावी लागेल, असं स्पष्ट केलं. तसेच ते जो निर्णय देतील तो मान्य करावा लागेल, असंही नमूद केलं. यानंतर आजपर्यंत फर्नांडीस यांनी लवादाकडे अपिल केलं नाही. ते लवादाकडे गेले असते, तरी तेथेही आम्ही विरोध करण्याचं काही कारण नव्हतं,” असं समीर भुजबळ यांनी सांगितलं.
“सुप्रिया ताईंचा मला फोन आला, त्यांनी सांगितलं की…”
समीर भुजबळ पुढे म्हणाले, “अचानक वर्ष दीड वर्षांपूर्वी सुप्रिया ताईंचा मला फोन आला. त्यांनी मला सांगितलं की, त्यांना अंजली दमानियांचा फोन येत आहे. ते प्रकरण काय आहे हे मी त्यांच्याकडे जाऊन सांगावं. मी सुप्रिया ताईंना वाय. बी. चव्हाणला भेटलो, प्रकरण समजून सांगितलं. त्यावेळी मी ज्यांना या व्यवहारासाठी पैसे दिले त्या नरोना यांनाही बरोबर घेऊन गेलो होतो. तेथेही दमानियांनी भांडण केलं आणि नरोना यांना बाहेर काढून दिलं. नरोनाबरोबर आम्हाला चर्चा करायची नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. यावेळी सुप्रिया सुळे यांनी माझं ऐकून घेतलं आणि आपण एकत्र भेटून मध्यम मार्ग काढू, असं सांगितलं.”
हेही वाचा : भुजबळांविरोधात मोठा खुलासा करण्याच्या घोषणेनंतर अंजली दमानिया पोलिसांच्या ताब्यात
“मी सुप्रिया सुळेंसमोर त्यांना ५० लाख रुपयांचा चेक दिला”
“फर्नांडीस यांनी पती वारल्याचं सांगितलं. त्यानंतर मी सुप्रिया सुळेंसमोर त्यांना ५० लाख रुपयांचा चेक दिला. तसेच त्यांच्या काही अडचणी असतील, तर सोडवा असं म्हटलं. हा चेक मी २२ ऑक्टोबर २०२२ रोजी दिला. आता वर्ष झालं आहे. कदाचित दमानियांच्या सांगण्यावरून त्यांनी हा चेकही बँकेत टाकला नसेल. आम्ही कुणाचंही काहीही लाटलेलं नाही,” असंही समीर भुजबळ यांनी नमूद केलं.