कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या समीर गायकवाडच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने शनिवारी २८ सप्टेंबरपर्यंत वाढ केली. त्यामुळे आता पोलिसांना समीरच्या चौकशीसाठी आणखी काही वेळ मिळणार आहे. लवकरच पोलिसांकडून समीरची ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट करण्यात येण्याची शक्यता आहे. यापूर्वी फॉरेन्सिक पथकाकडून समीरच्या फोनवरील संभाषणातील आवाजाचे नमुने तपासण्यात आले होते. त्यांनी समीरच्या आवाजाचे नमुने व त्याच्या मानसिक स्थितीचा अभ्यास आधुनिक तंत्राद्वारे केला होता. तसेच सध्या सायबर सेल समीरच्या घरातून जप्त करण्यात आलेले २३ मोबाईल आणि ३१ सीमकार्डची सखोल तपासणी करत आहे. यापूर्वीच्या तपासात समीर याचे भाऊ सचिन याच्याशी वेगवेगळ्या लोकांच्या मोबाईलवरून संभाषण होत असल्याची माहिती पुढे आली होती. त्यामुळे पोलिसांनी एकाच मोबाईल ऐवजी वेगवेगळ्या मोबाईलवर बोलणे का होत होते, या बाजूने तपास सुरू केला होता. ज्या लोकांच्या मोबाईलवरून बोलणे झाले आहे अशा सांगलीतील २५ लोकांना नोटीस पाठविली गेली होती.
सांगली येथे राहणाऱ्या गायकवाडला विशेष तपास पथकाने मागील बुधवारी अटक केली होती. न्यायालयाने त्याला ७ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर त्याला २३ सप्टेंबर रोजी पुन्हा न्यायालयामध्ये उभे केले असता पोलीस कोठडीत ३ दिवसांची वाढ करण्याचे आदेश देण्यात आले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा