गेल्या काही दिवसांपासून नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीचे माजी विभागीय प्रमुख समीर वानखेडे वादाच्या भोवऱ्यात अडकत आहेत. अलीकडेच केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) समीर वानखेडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आर्यन खान अटकप्रकरणी समीर वानखेडे यांनी २५ कोटींची लाच मागितली, असा आरोप सीबीआयने केला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून समीर वानखेडे यांच्याशी संबंधित २९ ठिकाणांवर सीबीआयच्या पथकाने छापेमारी केली आहे.
२५ कोटींच्या लाचप्रकरणी सीबीआयकडून तपास सुरू असताना ड्रग्ज प्रकरणातील आरोपी करण सजनानी यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. समीर वानखेडे आणि आशिष रंजन यांनी सुशांतसिंह राजपूत मृत्युप्रकरणात कटकारस्थान रचण्यासाठी आपल्याला आरोपी बनण्यास सांगितलं होतं, असा गौप्यस्फोट सजनानी यांनी केला. सुशांतसिंह मृत्यूप्रकरणात आरोपी बनल्यास तुला लवकरात लवकर तुरुंगातून बाहेर काढू, असं आश्वासन समीर वानखेडे यांनी दिलं होतं, असा दावाही सजनानी यांनी केला.
हेही वाचा- समीर वानखेडेंचे पाय खोलात, परदेश दौरे, महागडी घडय़ाळे चौकशीच्या फेऱ्यात
‘टीव्ही ९ मराठी’शी संवाद साधताना करण सजनानी म्हणाले, “एनसीबीचे अधिकारी आशिष रंजन आणि समीर वानखेडे यांनी म्हटलं होतं की, आता तुमच्यावर २०० किलो ड्रग्ज प्रकरणात कारवाई करत आहोत. पण दोन आठवड्यानंतर तुम्हाला पुन्हा यावं लागेल आणि सुशांतसिंह प्रकरणात आरोपी बनावं लागेल. समीर वानखेडे यांना सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी कट रचण्यासाठी ३० हून अधिक लोकांची गरज होती. त्यामुळे त्यांनी मला म्हटलं की, तुम्ही आम्हाला मदत करा. याच्या बदल्यात आम्ही तुम्हाला लवकरात लवकर तुरुंगातून बाहेर काढू… पण मी सुशांतसिंहला ओळखतही नव्हतो. पण ते (समीर वानखेडे) असं का करत होते? ते मला माहीत नाही.”
हेही वाचा- “देशभक्त असल्याची शिक्षा मिळतेय”, आर्यन खानला अटक करणाऱ्या अधिकाऱ्याची प्रतिक्रिया
खरं तर, एनसीबीने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्यावर ड्रग्जप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या ड्रग्जप्रकरणात करण सजनानी हे सहआरोपी आहेत.