प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक झाली. मात्र, नंतरच्या काळात आर्यन खानविरोधात कोणतेही पुरावे न आढळल्याने त्याला क्लीन चिट देण्यात आली. याबाबत तत्कालीन मुंबई एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांना विचारण्यात आलं. तसेच एनसीबीचा तपास कमी पडल्याने क्लीन चिट मिळाली का असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. यावर वानखेडेंनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते बुधवारी (२४ ऑगस्ट) वाशीम येथे आले असताना पत्रकार परिषदेत बोलत होते.

आर्यन खानला क्लीन चिट का मिळाली? एनसीबी तपासात कमी पडली का? या प्रश्नावर समीर वानखेडे म्हणाले, “ते प्रकरण न्यायालयात आहे. त्यावर मी कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही. मी एनसीबीत कार्यरत देखील नाही. त्यामुळे त्यावर काही बोलणं योग्य नाही.”

“तुमच्या कुटुंबातून कुणी राजकारणात येणार का?”

राजकारणात येण्याबाबतच्या प्रश्नावर समीर वानखेडे म्हणाले, “याविषयी मी कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही. मी भारताचा एक सेवक आहे आणि सर्वप्रकारे सेवा करत राहीन.”

“तुमचा भाजपाशी संबंध आहे या आरोपावर काय सांगाल?”

भाजपाशी संबंध असल्याच्या आरोपाबाबत विचारलं असता समीर वानखेडे म्हणाले, “मी कायदा पाळणारा माणूस आहे आणि केवळ संविधानाचं पालन करतो.”

“आरोप करणारे मलिक तुरुंगात आणि तुम्ही बाहेर याकडे कसं बघता?”

या पत्रकार परिषदेत समीर वानखेडेंना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांविषयी आणि त्यांच्या अटकेवरही प्रश्न केला. “तुमच्यावर आरोप करणारे नवाब मलिक तुरुंगात आहेत आणि तुम्ही बाहेर आहात याकडे कसं बघता?”, असा प्रश्न समीर वानखेडेंना विचारण्यात आला.

त्यावर ते म्हणाले, “त्या व्यक्तीविषयी मला काहीही भाष्य करायचं नाही. त्यांनी माझ्यावर खालच्या स्तरावरील आरोप केले होते. त्यामुळे मला त्यांच्यावर काहीही बोलायचं नाही.”

हेही वाचा : विश्लेषण : आर्यन खानला का सोडावे लागले?

“पुन्हा महाराष्ट्रात काम करण्याची इच्छा आहे का?”

पुन्हा महाराष्ट्रात काम करण्याची इच्छा आहे का? या प्रश्नावर समीर वानखेडे म्हणाले, “मला भारतात कुठेही पाठवलं तरी मी काम करेन. मी एक शिस्तबद्ध सैनिक आहे.”