अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याबद्दल विशेष चौकशी समितीने अनेक खुलासे केले आहेत. एनसीबीचे अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांच्या नेतृत्त्वाखाली ही समिती स्थापन करण्यात आली आहे. आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अडकवू नये म्हणून शाहरुख खानकडून २५ कोटी रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी वानखेडेंविरुद्ध सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी तपासादरम्यान समितीचा अहवाल आला आहे. या अहवालात वानखेडेंविरोधात अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. हिंदुस्तान टाईम्सने या संदर्भातील वृत्त दिले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

समीर वानखेडे यांनी २०१७ ते २०२१ दरम्यान सहा परदेशी दौरे केले आहेत. यामध्ये यूके, आयर्लंड, पोर्तुगाल, दक्षिण आफ्रिका आणि मालदीव या देशांचा समावेश आहे समावेश आहे. या परदेश दौऱ्यांसाठी समीर वानखेडे यांनी ८.७५ लाखांचा खर्च दाखवला आहे, जो वास्तविक खर्चापेक्षा खूपच कमी आहे. लंडनच्या १९ दिवसांच्या सहलीसाठी, वानखेडेने यांनी एक लाखांचाच खर्च दाखवला होता. तर, तिथे ते एका नातेवाईकाकडे राहिले होते, असं दाखवण्यात आलं आहे. वानखेडे यांनी १७ लाख ४० हजार मध्ये रोलेक्स गोल्ड घड्याळ खरेदी केले. परंतु, या घड्याळ्याची मूळ किंमत २२ लाख ५ हजार आहे. एवढंच नव्हे तर वानखेडे यांचे मुंबईत चार फ्लॅट असल्याचा दावाही दक्षता अहवालात करण्यात आल्याचा दावा या वृत्तात करण्यात आला आहे आहे. तसंच, मुंबईत त्यांच्या नावे सहा मालमत्ता असून ते वडिलोपार्जित मालमत्ता आहेत, असंही अहवालातून स्पष्ट झालं आहे.

हेही वाचा >> आर्यन खानसाठी २७ लाखांची फुकट तिकिटं, रेव्ह पार्टीचं प्रमोशन…समीर वानखेडेंच्या Whatsapp चॅटमधून धक्कादायक खुलासे!

व्हॉट्सअॅप चॅट व्हायरल

समीर वानखेडेंनी या प्रकरणासंदर्भात तेव्हा त्यांच्या वरीष्ठ अधिकाऱ्याची केलेल्या व्हॉट्सअॅप चॅटचे फोटो सध्या व्हायरल झाले आहेत. व्हॉट्सअॅप चॅट्स हे समीर वानखेडे आणि तत्कालीन एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह यांच्याबरोबर झाल्याचं दिसत आहे. यामध्ये कॉर्डेलिया क्रूजवर समीर वानखेडेंच्या टीमनं छापा टाकल्यानंतरच्या घडामोडींदरम्यानचं या दोघांमधलं संभाषण दिसत आहे. यानुसार, आर्यन खानला या क्रूज पार्टीसाठी तब्बल २७ लाखांची व्हीव्हीआयपी तिकीटं देण्यात आली असल्याचा दावा करण्यात आला आहे. या क्रूज पार्टीचं प्रमोशन करण्यासाठी आर्यन खान आणि त्याच्या आठ मित्रांसाठी ही तिकिटं देण्यात आल्याचा दावा या चॅटच्या हवाल्याने वृत्तात करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sameer wankhede owns 4 flats in mumbai made 6 foreign trips in 5 years reports sgk