गेल्या काही दिवसांपासून नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीचे माजी विभागीय प्रमुख समीर वानखेडे वादाच्या भोवऱ्यात अडकत आहेत. अलीकडेच केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) समीर वानखेडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. आर्यन खान अटकप्रकरणी समीर वानखेडे यांनी २५ कोटींची लाच मागितली, असा आरोप सीबीआयने केला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून समीर वानखेडे यांच्याशी संबंधित २९ ठिकाणांवर सीबीआयच्या पथकाने छापेमारी केली आहे.

याप्रकरणी सीबीआयकडून चौकशी सुरू असताना ड्रग्ज प्रकरणात अटक केलेल्या एका ब्रिटीश नागरिकाने समीर वानखेडे यांच्या पथकावर गंभीर आरोप केला. समीर वानखेडे यांच्या पथकाने छापेमारीदरम्यान ३० लाखांचे घड्याळ चोरले, असा आरोप ब्रिटीश नागरिक करण सजनानी यांनी केला. संबंधित घड्याळ Rolex कंपनीचं असून आपल्या सासऱ्याने लग्नात भेट दिलं होतं, असंही सजनानी म्हणाले.

विशेष म्हणजे महागड्या घड्याळाच्या खरेदी आणि विक्रीप्रकरणी एनसीबीच्या व्हिजीलन्स पथकाने समीर वानखेडेची चौकशी केली होती. पण हे घड्याळ नेमकं कसं आलं? हे वानखेडेंना सांगता आलं नाही. वानखेडे यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार आणि खंडणीप्रकरणी दाखल सीबीआयच्या एफआयआरमध्ये याचा उल्लेख आहे.

हेही वाचा- “वानखेडेंनी सुशांतसिंह प्रकरणात आरोपी बनण्यास सांगितलं”, ड्रग्ज प्रकरणातील आरोपीचा गौप्यस्फोट

‘इंडिया टुडे’शी संवाद साधताना ब्रिटीश नागरिक करण सजनानी म्हणाले, “मला अटक केल्यानंतर तपास अधिकाऱ्याने माझं ३० लाख रुपये किमतीचं Daytona Rolex घड्याळ काढून घेतलं. त्यानंतर जप्त केलेल्या वस्तूंच्या यादीत हे घड्याळ नमूद करण्यात आलं. या प्रकरणाचे तपास अधिकारी आशिष रंजन होते.”

हेही वाचा- चौकशीसाठी हजर व्हा! समीर वानखेडेंना सीबीआयने बजावलं समन्स

समीर वानखेडे आणि त्यांच्या टीमने जानेवारी २०२१ मध्ये करण सजनानीला अटक केली होती. १२५ किलो गांजा आयात केल्याचा आरोप सजनानी यांच्यावर होता. पण जप्त केलेल्या अमली पदार्थांमध्ये केवळ साडेसात ग्रॅम गांजा होता. इतर वस्तूंमध्ये सुगंधी तंबाखू होती, असा दावा सजनानी यांनी केला. सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यात समीर वानखेडे निर्दोष सुटले तर मी वैयक्तिकपणे वानखेडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करणार आहे, असा इशाराही सजनानी यांनी दिला.

Story img Loader