गेल्या काही वर्षांमध्ये राजकीय वादाच्या केंद्रस्थानी आलेल्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं लवकरच उद्घाटन केलं जाणार आहे. आधी या महामार्गासाठीच्या जमीन अधिग्रहणामुळे आणि नंतर त्याच्या नामकरणामुळे हा महामार्ग कायम चर्चेत राहिला. मात्र, त्याच्या उद्धाटनानंतर मुंबई ते नागपूर हे ७०१ किलोमीटरचं अंतर वेगाने पार करता येणार आहे. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग असं या द्रुतगती मार्गाचं नामकरण करण्यात आलं आहे. यानंतर या महामार्गावर वाहनांना नेमका किती टोल भरावा लागणार? यासंदर्भात वेगवेगळी माहिती आणि अंदाज समोर येत होते. मात्र, आता पहिल्यांदाच महामार्गावर भराव्या लागणाऱ्या टोलची अधिकृत आकडेवारी समोर आली आहे.
समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनापूर्वी या महामार्गाच्या टोलची माहिती देणारा फलक महामार्गाच्या कडेला लावण्यात आला असून त्याचा फोटो सध्या व्हायरल होऊ लागला आहे. या फोटोमध्ये सर्व प्रकारच्या वाहनांसाठी नेमका किती टोल भरावा लागणार, यासंदर्भातली माहिती देण्यात आली आहे. टोलचे हे दर ३१ मार्च २०२५ पर्यंत अर्थात पुढील जवळपास तीन वर्षांसाठी लागू असतील, असंही या फलकावर नमूद करण्यात आलं आहे.
चारचाकी साध्या वाहनांसाठी १२०० रुपये टोल!
या फलकावर नमूद केलेल्या दरांनुसार, साध्या चारचाकी वाहनांसाठी, अर्थात कार्ससाठीचा टोल या फलकावर नमूद करण्यात आला आहे. त्यानुसार, या महामार्गावर प्रवास करणाऱ्या चारचाकी गाड्यांसाठी प्रतिकिलोमीटर १.७३ रुपये टोलची वसुली करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबई पासून थेट नागपूरपर्यंत ७०१ किलोमीटरचा पूर्ण प्रवास करणाऱ्या चारचाकी गाड्यांना जवळपास १२०० रुपये टोल भरावा लागणार आहे.
वाहन प्रकार आणि त्यासाठीचा टोल…
१. मोटर, जीप, व्हॅन अथवा हलकी मोटर वाहने – १.७३ रुपये प्रतीकिमी
२. हलकी व्यावसायिक वाहने, हलकी मालवाहतुकीची वाहने अथवा मिनी बस – २.७९ रुपये प्रतिकिमी
३. बस अथवा ट्रक – ५.८५ रुपये प्रतिकिमी
४. तीन आसांची व्यावसायिक वाहने – ६.३८ रुपये प्रतिकिमी
५. अवजड बांधकाम यंत्रसामग्री, अनेक आसांची वाहने – ९.१८ रुपये प्रतिकिमी
६. अतिअवजड वाहने (सात किंवा जास्त आसांची) – ११.१७ रुपये प्रतिकिमी