राज्यातला मोठा महामार्ग अशी ख्याती असलेला आणि नुकतंच लोकार्पण झालेला समृद्धी महामार्ग सातत्याने अपघातांमुळे चर्चेत आहे. रविवारी (आज, १२ मार्च) सकाळी या महामार्गावर एका कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील ६ प्रवासी जागीच ठार झाले आहेत. तर सात प्रवासी गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बुलडाण्यातील मेहकरजवळ भरदाव कार उलटून हा अपघात झाला आहे. मारुती सुझुकी अर्टिगा कारमधून १३ प्रवासी प्रवास करत होते. यापैकी सहा प्रवासी जागीच ठार झाले आहेत. तर सात प्रवासी जखमी आहेत. मृतांमध्ये चार महिला, एक लहान मूल आणि चालकाचा समावेश आहे. दरम्यान, अपघातग्रस्तांना तातडीने मदत न मिळाल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे.
स्थानिकांनी एबीपी माझाला सांगितलं की, “सकाळी ७.५५ वाजता लोणार तालुक्यातील मेहकरजवळ हा अपघात झाला. अर्टिगा कारमधून १३ जण प्रवास करत होते. ही कार उलटून अपघात झाला. अपघातानंतर पाऊण तास अपघातग्रस्तांना कोणतीही शासकीय मदत मिळाली नाही. त्यानंतर अधिकारी तिथे दाखल झाल्यावर त्यांनी गावकऱ्यांनाच दमदाटी केली.”
हे ही वाचा >> “महाराष्ट्रातल्या कुत्र्यांना…” बच्चू कडूंच्या वक्तव्यावरून आसामच्या विधानसभेत गोंधळ, अटकेची मागणी
अपघातग्रस्तांना पाऊण तास मदत मिळाली नाही
दरम्यान, हा बुलडाण्यात समृद्धी महामार्गावर झालेला आतापर्यंतचा ४० वा अपघात आहे. हा आतापर्यंतचा सर्वात भीषण अपघात आहे. अपघातानंतर पाऊण तास क्विक रिस्पॉन्स टीम किंवा इतर कुठलीही शासकीय यंत्रणा अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी पोहोचली नसल्याचे स्थानिकांनी सांगितले. आता समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी शासनाकडून कोणत्या उपाययोजना केल्या जातायत याकडे लोकांचं लक्ष असेल.