मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा (शिर्डी – नागपूर) राज्यातील जनतेसाठी सुरू होऊन काही महिनेच झाले आहेत. परंतु, हा महामार्ग सातत्याने वेगवेगळ्या अपघातांमुळे चर्चेत असतो. शनिवारी (१४ ऑक्टोबर) मध्यरात्री समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ६ वर्षांच्या एका चिमुकल्यासह १२ जण जागीच ठार झाले आहेत. बुलढाण्याहून नाशिकला जाणाऱ्या खासगी टेम्पो ट्रॅव्हलरने रस्त्याकडेला उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिली आणि या अपघातात १२ जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात २३ जण जखमी झाले आहेत. या टेम्पो ट्रॅव्हरलमध्ये एकूण ३५ प्रवासी होते.
या टेम्पो ट्रॅव्हलरने प्रवास करणारे सर्व प्रवासी हे नाशिक जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळाली आहे. हे प्रवासी बुलढाण्यातील बाबा सैलानींच्या दर्शनाला गेले होते. तिथून घरी परतत असताना त्यांच्या गाडीचा अपघात झाला. दरम्यान, घटनास्थळी स्थानिकांच्या मदतीने मतदकार्य सुरू असून अपघातात जखमी झालेल्या २३ प्रवाशांना छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याबाबतचं वृत्त एबीपी माझाने प्रसिद्ध केलं आहे.
हे ही वाचा >> “अध्यक्षांना आता आयसीयूत जाण्याची वेळ आली”; संजय राऊतांच्या टीकेवर राहुल नार्वेकर म्हणाले…
टेम्पो ट्रॅव्हलरच्या चालकाला झोप लागल्याने हा अपघात झाल्याचं काहींनी सांगितलं. तर जखमी प्रवाशांनी दावा केला आहे की पोलिसांनी एक ट्रक थांबवला होता. हा ट्रक रस्त्याकडेला उभा होता. ट्रकचालक तिथून ट्रक काढत असताना टेम्पो ट्रॅव्हलरने मागून धडक दिली. पोलिसांनी अद्याप या अपघाताबद्दल अधिकृत माहिती दिलेली नाही.