वेगवेगळ्या कारणांनी राज्यातील समृद्धी महामार्ग चर्चेत राहिला आहे. आधी राजकारणामुळे आणि त्यानंतर समृद्धी महामार्गावर होणाऱ्या अपघातांमुळे हा राजकीय चर्चेचा विषय ठरला. मात्र आता हा महामार्ग पू्र्ण झाल्यानंर दिवसभरात लाखो प्रवासी या मार्गावरून प्रवास करताना दिसत आहेत. या सर्व प्रवाशांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली असून या महिन्याभरात एकूण ५ दिवस समृद्धी महामार्गावरचे दोन टप्पे वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत. त्यामुळे त्या दिवशी समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी त्यानुसारच आपलं प्रवासाचं नियोजन करणं आवश्यक आहे. हा मार्ग बंद असताना इतर पर्यायी मार्गांचाही प्रवासी वापर करू शकतात.
महामार्ग बंद असण्याचं कारण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गावर पॉवर ग्रीड ट्रान्समिशनसाठीच्या उच्चदाब विद्युत वाहिनीचं काम हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी या दोन टप्प्यांमधली वाहतूक पूर्णपणे बंद ठेवली दाणार आहे. हे काम झाल्यानंतर या मार्गांवरची वाहतूक पुन्हा सुरू केली जाईल.
कोणत्या टप्प्यांत कधी असेल वाहतूक बंद?
समृद्धी महामार्गावर १० ऑक्टोबर ते १२ ऑक्टोबर हे तीन दिवस आणि नंतर २५ व २६ ऑक्टोबर हे दोन दिवस वाहतूक बंद असेल. जालना ते औरंगाबाद या पट्ट्यात या दोन कालावधीमध्ये दोन्ही बाजूची वाहतूक बंद ठेवण्यात येईल. हे पाच दिवस पूर्णपणे वाहतूक बंद असेल.
पर्यायी मार्ग कोणता?
ज्या पाच दिवशी समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी बंद असेल, त्या दिवशी प्रवाशांना इतर काही पर्यायी मार्गांचा वापर करता येईल. यासाठी मुख्य मार्गावरून वाहतूक बंद असलेल्या दिवशी निधोनाजवळील जालना इंटरजेंज आयसी १४ मधून मुख्य मार्गावरून बाहेर पडता येईल. तिथून निधोना एमआयडीसीमार्गे जालना-छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावरून केंब्रिज शाळेपर्यंत येऊन नंतर उजवीकडे सावंगी बायपासमार्गे इंटरजेंज आयसी १६ वरून पुन्हा मुख्य मार्गावर येता येईल. शिर्डीकडून नागपूरकडे जाणाऱ्या दिशेसाठीही हाच मार्ग विरुद्ध बाजूने वापरता येईल. अर्थात इंटरजेंज आयसी १६ ते इंटरजेंज आयसी १४.