धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी काही दिवसांपूर्वी संत तुकाराम महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान केलं होतं. आता मुंबईत धीरेंद्र शास्त्री यांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार टीका केली आहे. सनातन धर्म ही देशाला लागलेली कीड आहे, असं विधान आव्हाडांनी केलं.
धीरेंद्र कृष्ण शास्त्री याला मुंबईत बोलावून सभा घेतल्या जात आहेत, याबाबत विचारलं असता जितेंद्र आव्हाड म्हणाले, “सनातन धर्माचा प्रचार करणाऱ्यांना मुंबईत बोलावून सभा घेतल्या जात आहेत. हे आमचं दुर्दैव आहे.सनातन धर्माची व्याख्या आणि सनातन धर्म म्हणजे काय? हे आपण समजूनच घेत नाही. ते सनातन धर्माला हिंदू धर्माशी जोडून आपल्या हातात देतात. पण सनातन धर्म हा पूर्णपणे वेगळा आहे. सनातन धर्माने पाच हजारहून अधिक वर्षे येथे वर्णव्यवस्था राबवली. येथील ९५ ते ९७ टक्के समाजाला शिक्षणापासून वंचित ठेवलं. अधिकारापासून वंचित ठेवलं. तो सनातन धर्म आहे.”
हेही वाचा- “…तर आपल्या बाब्याला कार्टं व्हायला वेळ लागणार नाही”, बीडमध्ये पंकजा मुंडेंचं सूचक विधान!
या सनातन धर्मीयांविरुद्ध गोपाळ गणेश आगरकर, गोपाळ कृष्ण गोखले, श्रीपाद अमृत डांगे असे लोक उभे राहिले. हे मोठे-मोठे ब्राह्मण लोक या व्यवस्थेविरोधात बोलले. ते ब्राह्मणांविरुद्ध नव्हते, पण लोकांच्या डोक्यात जो ब्राह्मण्यवाद होता, जो आजही आहे. याने सर्वाधिक हानी होत आहे. यात ब्राह्मणांचा काहीही दोष नाही. ब्राह्मण याच्यात पिसले जातात. कारण नसताना बिचाऱ्यांना वाईटपणा येतो. येथे मोठे मोठे पुरोगामी विचारधारा बाळगणारे आणि त्याला पुढे नेणारे ब्राह्मण होते. हेही मला समाजाला सांगायचं आहे.
हेही वाचा- “भास्कर जाधव कुत्र्यासारखा बेफाम…”, रामदास कदमांची शिवराळ भाषेत टीका!
“आगरकर हे मागासवर्गीय नव्हते, ते ब्राह्मण होते. ते प्रोफेसर होते. गोपाळ कृष्ण गोखले यांना गांधीजी आपला बाप मानायचे. ते गोपाळ कृष्ण गोखले हे ब्राह्मण होते. पण ते पुरोगामी विचारांचे होते. त्यामुळे सनातन धर्म हा देशाला लागलेली कीड आहे. ही कीड पोसू नका. येथील अठरा पगड जातींनी याचा विचार करायला हवा. सनातन धर्म परत मागच्या दाराने पुढे येऊ पाहतंय. परत महिलांना घरी बसवा, पाळी आली असेल तर तिला घराच्या बाहेर बसवा, विधवा झाली तर तिचे केस उपटून काढा… अशा प्रथा आणू पाहतंय, हे जरा वाचा. शाहू-फुले-आंबेडकर यांनी या समाजात किती बदल घडवून आणला याचा विचार करा,” असं आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी केलं. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.