रामलीला मैदानावर दिलेल्या लेखी आश्वासनाची पूर्तता करण्याची आठवण करून देतानाच संसदेच्या चालू अधिवेशनातच राज्यसभेत जनलोकपल विधेयक मंजूर करण्याची मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मंगळवारी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे. काँग्रेस तथा सत्ताधारी यूपीए आघाडीच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनाही हे पत्र पाठविण्यात आले आहे.
पंतप्रधान कार्यालयाकडून हजारे यांना दि. २४ जुलैला आलेल्या पत्रात संसदेच्या या पावसाळी अधिवेशनात राज्यसभेत जनलोकपाल विधेयक मंजूर करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. या पार्श्र्वभूमीवर हजारे यांनी आज पुन्हा पत्र पाठवले आहे. यात त्यांनी म्हटले आहे, की लोकसभेत दि. २७ डिसेंबर रोजी जनलोकपाल विधेयक मंजूर झाले आहे. राज्यसभेच्या निवड समितीनेही या विधेयकास दि. २३ नोव्हेंबर १२ ला मान्यता दिली आहे. पावसाळी अधिवेशनाचा आता फार काळ उरलेला नाही. त्यामुळेच ते आताच मंजूर करावे असे या पत्रात म्हटले आहे.
जनलोकपाल विधेयकाच्या मागणीसाठी रामलीला मैदानावर करण्यात आलेल्या देशव्यापी आंदोलनादरम्यान पंतप्रधानांनी जे लेखी आश्वासन दिले होते ते त्यांनी आता पूर्ण केले पाहिजे अशी अपेक्षाही हजारे यांनी या पत्रात व्यक्त केली आहे. भ्रष्टाचारमुक्त भारताच्या निर्मितीसाठी देशातील एकशेवीस कोटी जनता ही मागणी करीत आहे. त्यामुळे हे विधेयक मंजूर करणे सरकारचे कर्तव्य आहे. या कर्तव्य भावनेतून सरकार या अधिवेशनात या बिलास मंजुरी देईल अशी इच्छा हजारे यांनी व्यक्त केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा