पालघर : मासवण परिसरात बेकायदा वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनचालकाला अडविणाऱ्या एका पोलीस शिपायावर वाळू माफियांनी हल्ला केल्याचा प्रकार घडला.
मनोरनजीक बेकायदेशीर वाळू वाहतूक करणारे वाहन पोलीस शिपाई प्रेमकुमार पावडे यांना दिसल्याने त्यांनी चालकाला थांबण्यास सांगितले. मात्र वाहन थांबवून चालक तेथून फरार झाला. तो गेल्यानंतर पावडे यांनी आपल्या वरिष्ठांना ही घटना कळविली. दरम्यानच्या काळात आठ ते दहा अज्ञात व्यक्ती पावडेजवळ पोहोचले. प्रसंगावधान राखण्याचा प्रयत्न करणाऱ्या पावडे यांच्यावर या अज्ञातांनी बॅट, स्टम्पस व वायरीने हल्ला चढविला. ही मारहाणीची घटना बुधवारी दुपारी तीन-साडेतीनच्या सुमारास घडली. मारहाणीत जखमी झालेले पावडे तशाच अवस्थेत मनोर पोलीस ठाण्यात पोचले. त्यांनी वरिष्ठांना ही हकीकत सांगितली. मनोर पोलीस ठाण्यामध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास सुरू असल्याचे सहायक पोलीस निरीक्षिका सिद्धबा जायभोये यांनी सांगितले.