निलंगा तालुक्यात चोरून वाळूउपसा करणाऱ्या ठेकेदार, तसेच वाहनचालकांविरुद्ध तहसीलदार नामदेव टिळेकर यांनी दंडात्मक कारवाई सुरू केली. त्यामुळे वाळूमाफियांचे धाबे दणाणले आहेत. महसूल प्रशासनाने अवैध वाळूवाहतूक करणाऱ्या ११ वाहनांवर कारवाई करून सुमारे १ लाख ११ हजार रुपये दंड वसूल केला.
बांधकाम व्यवसायातील तेजीमुळे वाळूचे भाव वधारले आहेत. त्यामुळे बांधकाम ठेकेदार व राष्ट्रीय पक्ष संघटनांच्या कार्यकर्त्यांनी वाळू व्यवसायाकडे आपला मोर्चा वळविला आहे. साहजिकच वाळू व्यवसायाला सोन्याचे दिवस आले आहेत, मात्र सरकारचा महसूल बुडवून अनेक वाळूमाफिया अवैध वाळूउपसा व वाहतूक मोठय़ा प्रमाणात करीत आहेत. निलंगा तालुक्यातील मांजरा, तेरणा नदीपात्रात होसूर, गिरकचाळ, गौर, बसपूर, तगरखेडा, मांजरवाडा, शिरोळ, शिऊर एक, शिऊर दोन, सोनखेड, सावरी असे एकूण ११ वाळूघाट आहेत. यातील शिऊर, सावरी, बसपूर, होसूर व तगरखेडा या पाच घाटांचा लिलाव झाला आहे. शिऊर व सावरी घाटांतून सध्या वाळूउपसा चालू असून, नुकतेच बसपूर घाटास ताबा पावती देण्यात आली.
होसूर व तगरखेडा घाटांत पाणी असल्याने ताबा पावती देण्यात आली नसल्याचे समजते. वाळू व्यवसायात आपले आर्थिक हितसंबंध जपले जावेत, यासाठी विविध पक्षसंघटनांचे कार्यकत्रे महसूल प्रशासनाकडे कारवाई व त्यातून वाचण्यासाठी प्रयत्न करीत असल्याची चर्चा नागरिकांत आहे. परंतु महसूल विभागाने कोणाचाही मुलाहिजा न ठेवता अवैध वाळूउपसा व वाहतूक थांबविण्यासाठी दंडात्मक कारवाईची मोहीम सुरू केली आहे. ठेकेदारांवर कारवाई करून अवैध वाळूउपसा बंद करण्यात आला. चोरून वाळूउपसा व वाहतूक करणाऱ्या ११ वाहनांकडून सुमारे १ लाख ११ हजार ७५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
वाळूचा अवैध साठा केल्याप्रकरणी कोकळगाव, सोनखेड गावांतील पाच जणांवर दंडात्मक कारवाईबाबत नोटीस बजावली. तालुक्यात विविध ठिकाणी केलेल्या अवैध वाळूसाठय़ांची शोध मोहीम सुरू असून, त्याविरुद्धही कारवाई सत्र सुरू केल्याचे तहसीलदार नामदेव टिळेकर यांनी सांगितले.

Story img Loader