वाळूतस्करांवर कारवाईसाठी गेलेल्या महसूल तसेच पोलीस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करून वाहने पळवून नेण्याची घटना देसवडे तसेच मांडवे परिसरात शनिवारी घडली. तहसीलदार डॉ. विनोद भाबरे यांनी एक ट्रॅक्टर, एक दुचाकी पोलिसांच्या ताब्यात दिली. दरम्यान, वाळूउत्खनन करणाऱ्या जेसीबी मशीनवरील कारवाईत पूर्वी महसूल विभागात काम करणाऱ्या अधिकाऱ्याने हस्तक्षेप केल्याची मांडवे परिसरात चर्चा असून हे मशिन घटनास्थळी सापडले नसले तरी त्याविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे तहसीलदार भांबरे यांनी सांगितले.
तहसीलदार डॉ. भांबरे हे मुळा नदीपात्रात वाळूतस्करांवर कारवाईसाठी गेले असता देसवडे येथे संगमनेर तालुक्यातील एका ट्रॅक्टरचालकाने धक्काबुक्की करून ट्रॅक्टर पळवून नेला. ट्रॅक्टर पळवून नेण्यासाठी मदत करणाऱ्याची दुचाकी मात्र भांबरे व पोलिसांनी ताब्यात घेतली. मांडवे येथे चोरीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करण्यात येऊन तो ताब्यात घेण्यात आला.
मांडओहळ नदीमध्ये वाळूउपसा करणारे जेसीबी मशीन तहसीलदार आल्याचा सुगावा लागताच पळवून नेण्यात आले. महसूल तसेच पोलिसांच्या पथकाने त्याचा पाठलाग करेपर्यंत हे मशीन मालकाच्या घरापुढे लावण्यात आले होते. तेथे हे पथक गेल्यानंतर मशीन मालकाने नदीमध्ये मशीन सापडले नसल्याचे कारण पुढे करून हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. या वाळूतस्कराने पूर्वी नगर जिल्हय़ात, महसूल विभागात कार्यरत असलेल्या व लाचेच्या सापळय़ात सापडल्यानंतर आता मुंबई येथे असलेल्या अधिकाऱ्यालाही फोन लावला. या अधिकाऱ्यानेही घरापुढील मशीनवर कशी कारवाई करता, असे म्हणत तहसीलदारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला.
आदिवासी लोकांशी भांडणे झाल्याने मांडओहळ नदीमध्ये वाळूचोरी सुरू असल्याचे तहसीलदारांना ते पोलिसांसह तेथे गेले असता तोपर्यंत मशीन तेथून हलविण्यात हा तस्कर यशस्वी झाला. हे मशीन रंगेहाथ पकडले नसले तरी त्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे तहसीलदारांनी सांगितले.
दरम्यान, सलग दोन दिवस सुटय़ा आल्याने तसेच महसूल प्रशासन निवडणुकीत गुंतल्याने मुळा नदीपात्रात जोरदार वाळूउपसा सुरू आहे. त्यातून शासनाचा कोटय़वधींचा महसूल बुडवला जात असून मुंबईतील अधिकाऱ्यांचेही या तस्करीस पाठबळ मिळत असल्याने पर्यावरणाचे काय होणार असा प्रश्न या परिसरातील नागरिकांपुढे निर्माण झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा