संगमनेर : संगमनेर तालुक्यात वाळू तस्करांनी उच्छाद मांडला आहे. अशाच एका वाळू तस्कराच्या मागावर गेलेल्या संगमनेरच्या तहसीलदार धीरज मांजरे यांच्या नेतृत्वाखालील महसूल विभागाच्या पथकावर वाळू तस्करांनी जेसीबी घालत अचानक हल्ला चढवला. सुदैवाने या प्राणघातक हल्ल्यातून पथक बचावले. या प्रकरणी दोन मुख्य आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, तहसीलदार धीरज मांजरे यांच्या नेतृत्वाखालील महसूल विभागाचे रात्र गस्तीपथक रात्रीच्या वेळी प्रवरा नदीपात्रात कनोली येथे अवैध वाळू उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी गेले होते. येथे पथकाला जेसीबीच्या सहाय्याने वाळू उत्खनन केले जात असल्याचे आढळून आले. त्यामुळे पथकाने जेसीबी तसेच विशाल आबाजी खेमनर आणि प्रवीण शिवाजी गवारी या दोघा उत्खनन करणाऱ्यांना ताब्यात घेत संगमनेरला आणत असताना त्यांचे साथीदार अंधाराचा फायदा घेऊन जेसीबी घेऊन पळून जाऊ लागले त्यामुळे पथकाने त्यांचा पाठलाग केला असता जेसीबी चालकाने पथकातील कर्मचाऱ्यांना ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या अंगावर जेसीबी घातला. सुदैवाने पथकातील कर्मचारी यातून बचावले असले तरी आरोपीच्या अन्य पाच-सहा साथीदारांनी महसूल पथकाला रस्त्यात आढळून जीवे मारण्याची धमकी दिली तसेच त्यांचे ताब्यातील जेसीबी घेऊन पळून गेले. या संदर्भात कामगार तलाठी संतोष बाबासाहेब शेलार यांच्या तक्रारीवरून संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात विविध कलमाद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान अवैध वाळू उत्खननावर कारवाईसाठी गेलेल्या महसूल विभागाच्या पथकावर वाळू तस्कराकडून झालेल्या हल्ल्याची माहिती मिळताच अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना आरोपींचा शोध घेण्याबाबत आदेश दिले. आहेर यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार मनोहर गोसावी, संदीप दरंदले, सागर ससाने, अमृत आढाव, फुरखान शेख, मेघराज कोल्हे व महादेव भांड यांचे पथक आरोपींच्या मागावर होते. गुन्ह्यातील आरोपी विशाल हौशीराम खेमनर हा त्याच्या साथीदारांसह संगमनेरमध्ये असल्याची माहिती पथकाला मिळाली. पथकाने शहरात आरोपीचा शोध घेतला असता त्यांना विशाल खेमनर व सागर गोरक्षनाथ जगताप हे दोघे आढळून आले.
पोलीस पथकाने त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी हा गुन्हा सोनू (पूर्ण नाव माहित नाही रा. डिग्रस, ता. संगमनेर), तुषार हौशीराम खेमनर (रा. अंभोरे, ता. संगमनेर), लखन मदने (रा. आश्वी, ता. संगमनेर) ताहीर शेख (रा. अंभोरे, ता. संगमनेर) यांच्या मदतीने केला असल्याचे कबूल केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी दिली आहे. दरम्यान तहसीलदारांसह त्यांच्या पथकावर झालेल्या हल्ल्यामुळे तालुक्यातील वाळू तस्करीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. मध्यंतरीच्या काळात बेकायदा वाळू तस्करीवर चांगल्या प्रकारचे नियंत्रण आले होते. परंतु मागच्या काही महिन्यांपासून वाळू तस्करांनी पुन्हा डोके वर काढले आहे.
संगमनेर तालुक्यातून प्रवरा आणि मुळा या प्रमुख नद्या वाहतात. या दोन्ही नद्यांची पात्रे वाळू तस्करांनी शब्दशः ओरबाडून काढली आहेत. यातून पर्यावरणाची मोठ्या प्रमाणावर हानी होण्याबरोबरच वाळू तस्करांमध्येच छोटी मोठी टोळी युद्ध होऊ लागली आहेत. पूर्वी चोरून लपून रात्रीच्या वेळी चालणारा वाळूचा गोरखधंदा आता दिवसाढवळ्या सुरू झाला आहे. गावोगाव वाळू तस्करांचे जाळे निर्माण झाले आहे. या वाळू तस्करांवर कोणाचेही नियंत्रण राहिले नसल्याचेच तहसीलदार यांच्यावरील हल्ल्यावरून अधोरेखित होते. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने वाळू तस्करांविरुद्ध धडक कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.