जिल्हाधिकाऱ्यांनी नियुक्त केलेल्या वाळूतस्करी विरोधातील पथकाने केलेल्या बेदम मारहाणीत देसवडे येथे मुळा नदीपात्रात वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू झाला. बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. महसूलच्या पथकातील तिघे व दोन पोलीस अशा पाच जणांवर याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल झाल्याने जिल्ह्य़ात खळबळ उडाली आहे. महसूलच्या पथकाने केलेल्या बेदम मारहाणीत जांबूत (ता.संगमनेर) रेवजी मेंगाळ हा अदिवासी ट्रॅक्टरचालक ठार झाला. तो वाळूचा वाहतूकदार होता. बुधवारी रात्री या नदीपात्रात गेलेल्या महसूल पथकाशी झालेल्या बाचाबाचीचे पर्यावसन मारहाणीत होऊन त्यातच मेंगाळ याचे निधन झाले.   
पोलीस प्रशासनाकडून कारवाई करण्यात दिरंगाई झाल्याच्या निषेधार्थ पोलीस उपाधीक्षक शाम घुगे यांच्यासह राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन वाहनांचे संतप्त ग्रामस्थांनी नुकसान केले.   जांबूत येथील ग्रामस्थांच्या प्रक्षोभामुळे मंडलाधिकारी पठाण, तलाठी मोराळे व केतकर यांच्यासह सहायक फौजदार जाधव, पोलीस कॉन्स्टेबल बढे यांच्याविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
उपाधीक्षक घुगे यांना घेराव घातल्यामुळे त्यांनी महसूल तसेच पोलीस प्रशासनाच्या वरिष्ठांशी संपर्क साधल्यानंतर  महसूल खात्याचे पथक नदीपात्रात आल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पथकातील पाचही कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केल्यानंतरच जमाव शांत झाला. नगर जिल्ह्य़ातील पारनेर व संगमनेर तालुक्यांच्या सरहद्दीवरून वाहणाऱ्या मुळा नदीपात्रात ही घटना घडली.

Story img Loader