Sandeep Deshpande on Uttar Bhartiya Vikas Sena Petition Against MNS : राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांच्या मनसे या पक्षाची मान्यता रद्द करावी, अशी मागणी उत्तर भारतीय विकास सेना नामक पक्षाचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर मनसेचे मुंबई शहर अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देशपांडे म्हणाले, “आमचा पक्ष राहणार की नाही राहणार हे आता भय्ये ठरवणार असतील तर भय्ये मुंबईत राहणार की नाही, त्यांना इथे राहू द्यायचं की नाही हे आम्हाला ठरवावं लागेल.”

संदीप देशपांडे म्हणाले, “आमचा पक्ष राहावा की राहू नये हे आता भय्ये ठरवणार का? आमच्या पक्षाची मान्यता रद्द व्हावी यासाठी भय्ये प्रयत्न करणार असतील तर या भय्यांना इथे राहू द्यायचं की नाही हे आता आम्हाला ठरवावं लागेल. या भय्यांना मुंबईत, महाराष्ट्रात ठेवायचं की नाही याचा आम्हाला विचार करावा लागेल.”

संदीप देशपांडे नेमकं काय म्हणाले?

मनसेचे मुंबई शहर अध्यक्ष म्हणाले, “त्या याचिकेमागील षडयंत्र तुम्ही लक्षात घ्या. हे सगळं प्रादेशिक पक्षांना संपवण्याचं षडयंत्र आहे. हे भाजपाचं षडयंत्र आहे. हे लोक (याचिकाकर्ते) भाजपाचेच पिट्टू आहेत. भाजपावाले या उभाविसेच्या माध्यमातून आमच्या पक्षाला नख लावण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र आम्ही अशा गोष्टींना घाबरत नाही. आम्हाला कोणी संपवण्याचा प्रयत्न केला तर त्या लोकांना इथे ठेवायचं की नाही याचाही आम्हाला विचार करावा लागेल.

तत्पूर्वी देशपांडे यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की कुठला तरी भैय्या म्हणे कोर्टात गेला आहे की मनसेची मान्यता रद्द करावी. मराठी माणसाचा पक्ष बंद व्हावा म्हणून भैय्ये प्रयत्न करणार असतील तर भैय्यांना मुंबईत, महाराष्ट्रात राहू द्यायचं का यावर विचार करावा लागेल.

प्रकरण काय?

मुंबईतील उत्तर भारतीय विकास सेना या पक्षाचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेविरोधात सर्वोच न्यायालयात याचिका दाखल केली आहे. राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांच्या पक्षाची मान्यता रद्द करावी, अशी मागणी या याचिकेद्वारे त्यांनी केली आहे. “राज ठाकरे हे उत्तर भारतीय लोकांविरोधातील हिंसेला पाठिंबा देत आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा, तसेच त्यांच्या पक्षाची मान्यता देखील रद्द करावी”, असं शुक्ला यांनी त्यांच्या याचिकेत म्हटलं आहे. त्यावर आता संदीप देशपांडे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.