माजी खासदार संभाजी छत्रपती यांनी ‘हर हर महादेव’ आणि ‘वेडात मराठे वीर दौडला सात’ या मराठी चित्रपटांना विरोध केल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड हेदेखील आक्रमक झाले होते. त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ठाणे जिल्ह्यातील एका मॉलमधील ‘हर हर महादेव’ या चित्रपटाचा शो बंद पाडला. परिणामी जितेंद्र आव्हाड यांच्यासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांविरोधात ठाण्यातील वर्तक नगर पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली आहे.
‘हर हर महादेव’ या चित्रपटाला विरोध म्हणून जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी ( ७ नोव्हेंबर ) रात्री ११ वाजता ठाण्यात आंदोलन केले. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रेक्षकांना सिनेमागृहातून बाहेर जाण्याचे आवाहन केले. त्यानंतरही सिनेमागृहात बसून असलेल्या प्रेक्षकांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हुसकावून लावल्याने किरकोळ वादाचे प्रसंगही घडले. आव्हाड यांच्यासह त्यांच्या १०० कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याप्रकरणी आज ( ११ नोव्हेंबर ) वर्तकनगर पोलिसांनी जितेंद्र आव्हाड यांना ताब्यात घेत अटक करण्यात आली.
हेही वाचा : “मला गप्पांमध्ये गुंतवून ठेवलं”, आव्हाडांनी ट्विट करत सांगितला अटकेआधीचा घटनाक्रम, म्हणाले “फाशी दिली तरी…”
यावरती आता मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “सिनेमागृहात जाऊन प्रेक्षकांना मारहाण करणे चुकीचं आहे. कायद्याने कायद्याचं काम केलं पाहिजे. आव्हाड यांनी जामीन न घेण्याची नाटके करून, भावनिक ब्लॅकमेल करण्याची गरज नाही. त्यांनी प्रेक्षकाला मारताना जगाने पाहिलं आहे, त्यामुळे ही कारवाई सूडबुद्धीने केली नाही. यांना आयुष्यभर जेलमध्ये ठेवलं पाहिजे. पोलिसांना आम्हीच कारवाई करण्याची मागणी केली होती,” असे संदीप देशपांडे यांनी म्हटलं.