राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एका भाषणात मुंबई शहराबाबत वादग्रस्त विधान केलं होतं. या विधानानंतर राज्यपालांवर टीकेची झोड उठत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही राज्यपालांवर टीका केली आहे. “राज्यपालांनी नको त्या गोष्टीत शहाणपणा करु नये”, असं म्हणत मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी राज्यपालांवर निशाणा साधला आहे.
राज्यपालांवर निशाणा
महाराष्ट्राच्या इतिहासाबाबत माहिती नसेल तर राज्यपालांनी नको त्या गोष्टीत आपलं नाक खुपसू नये. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा, फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या प्रगतीमध्ये मराठी माणसाचा मोठा हात आहे. इतर लोकांनी इथे येऊन आपली प्रगती करुन घेतली. १०५ हुताम्यांमुळं मुंबई महाराष्ट्रात आली आहे. त्यामुळं ज्या गोष्टींबद्दल आपल्याला माहिती नाही तर नको त्या गोष्टीत राज्यपालांनी नाक खुपसू नये, असा सल्ला देशपांडेंनी दिला आहे.
हेही वाचा- “५० खोकेवाले आता…”, राज्यपाल कोश्यारींच्या वादग्रस्त वक्तव्यावरून संजय राऊतांचा शिंदे गटावर हल्लाबोल
अन्यथा मनसे स्टाईलने उत्तर
राज्यपाल म्हणून आम्ही तुमचा, तुमच्या पदाचा आदर करतो. गुण्यागोविंदानं त्यांनी महाराष्ट्रात रहावं अन्यथा त्यांना मनसे स्टाईलने उत्तर दिले जाईल, असा इशारा संदीप देशपांडेंनी दिला आहे.