सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोर शिंदे गटावर गंभीर आरोप केले आहेत. या मुलखातीत त्यांनी मुंबई, आमदार फुटी, आगामी विधानसभा निवडणूक तसेच अन्य विषयांवर आपली भूमिका मांडली. या मुलाखतीचा पहिला भाग २६ जुलै रोजी तर दुसरा भाग आज (२७ जुलै) रोजी प्रदर्शित करण्यात आला. दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या या मुलाखतीवर मनसेने खरमरीत टीका केली आहे. ही मुलाखत म्हणजे माझाच बॉल माझीच बॅट, मीच अपंयार आणि मीच बॉलर अशी आहे, असे मनसेचे नेते संदीप देशपांडे म्हणाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, पण चर्चा त्यांनी उल्लेख केलेल्या पदाची, म्हणाले “महाराष्ट्राचे…”

टीव्ही ९ मराठीशी बोलत असताना संदीप देशपांडे यांनी वरील टीका केली आहे. “माझीच बॅट माझाच बॉल, मीच फिल्डर मीच अंपायर अशी ती मुलाखत आहे. आम्ही मराठी माणूस आहोत, असं उद्धव ठाकरे म्हणत आहेत. जेव्हा मनसेचे सहा नगरसेवक तुम्ही फोडले किंवा चोरले तेव्हाच मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम शिवसेनेने केले. त्यामुळे मराठी माणसाबद्दल बोलायचा हक्क शिवसेनेला नाही. प्रत्येक वेळी मुंबई धोक्यात आहे, महाराष्ट्राचे तुकडे होणार आहेत या भावनिक राजकारणाचा आता फायदा होणार नाही,” अशी टीका देशपांडे यांनी केली.

हेही वाचा >>> Uddhav Thackeray Interview: पुन्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री ते मुंबई पालिका निवडणूक, पाहा उद्धव ठाकरेंची संपूर्ण मुलाखत

“तुम्ही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना विचारले असते, तर राज ठाकरेंनी तुम्हाला पाठिंबा दिला असता. तुम्ही आमच्या पाठीत खंजीर खुपसला, तेव्हा तो मराठी माणसाच्या छातीत खंजीर खुपसलेला नव्हता का? शिवसेनेने भाजपाशी युती का तोडली, का ठेवली हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. शिवसेनेने जे कटकारस्थान केले त्याचे फळ शिवसेना आज भोगतेय,” असा टोलाही संदीप देशपांडे यांनी लगावला.

पाहा मुलाखत –

हेही वाचा >>> पुन्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार का? उद्धव ठाकरे म्हणाले “मी काय दुकान बंद करुन…”

दरम्यान, संजय राऊतांनी उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचा पहिला भाग २६ जुलै तर दुसरा भाग आज प्रदर्शित करण्यात आला. या दीर्घ मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी बंडखोर आमदारांवर सडकून टीका केली. बंडखोरांनी मी रुग्णालयात बेशुद्ध असतानाही सरकार पाडण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप यावेळी उद्धव ठाकरेंनी केला. तसेच बंडखोरी करणारे केवळ पालापाचोळा आहेत. त्यांची पानगळ होऊन पक्षाला नवीन पालवी फुटेल असा विश्वास उद्धव ठाकरेंनी या मुलाखतीमध्ये व्यक्त केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sandeep deshpande criticizes uddhav thackeray and shiv sena on interview taken by sanjay raut prd