देशातील संयुक्त विरोधी पक्षांची आज बिहारच्या पाटण्यात बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला राज्यातील विरोधी पक्षही सामील झाले आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे, युवानेते आदित्य ठाकरे बिहारला गेले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंनी सवाल उपस्थित केला आहे.
हेही वाचा >> पाटण्यातल्या विरोधी पक्षांच्या बैठकीत कोणती रणनीती ठरवली जाणार? शरद पवार म्हणाले…
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या निवासस्थानी होणाऱ्या बैठकीमध्ये किमान २० भाजपेतर पक्षांचे प्रमुख व नेते सहभागी झाले आहेत. तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी, आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, पीडीपीच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती आदी नेते गुरुवारीच पाटण्यात दाखल झाले होते. यावरून संदीप देशपांडे यांनी ठाकरेंवर टीका केली आहे.
“ज्या मेहबुबा मुफ्ती सईद यांच्यासोबत सत्ता स्थापन केली म्हणून तुम्ही आयुष्यभर (भाजपाला) टोमणे मारले, त्या सईद यांच्यासोबत तुम्ही बसणार आहात का? दुसऱ्यांनी केली की ती गद्दारी आणि तुम्ही केलं की ती देशभक्ती अशी दुहेरी भूमिका कशी काय असू शकते? स्वतःच्या स्वार्थाची वेळ आली की वेगळे निकष आणि इतरांसाठी वेगळे निकष का?” असा सवाल संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा >> “एकत्र येऊन आम्ही…”, विरोधकांच्या बैठकीआधी राहुल गांधींचा दावा, म्हणाले…
“ज्या मेहबुबा मुफ्ती यांनी ३७० कलमाला विरोध केला. त्यांच्यासोबत तुम्ही सत्तेसाठी मदत घेणार आहात का? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. एकत्र येण्यासाठी समान विचाराधारा असावी लागते. परंतु, यांच्यात कुठेही समान विचारधारा सापडत नाहीय. मुळात विषय असा आहे की मेहबुबा मुफ्ती सईद यांच्यासोबत आज तुम्ही व्यासपीठ शेअर करणार आहात का? की तेव्हाची भूमिका वेगळी होती, आताची वेगळी आहे? की तुम्ही तुमचं हिंदुत्त्व सोडलं आहे का? हे जनतेला सांगा”, असे अनेक प्रश्न संदीप देशपांडे यांनी उपस्थित केले.