२०१९ पासून महाराष्ट्रातील राजकारणाला कलाटणी मिळाली आहे. शिवसेनेतील बंडानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपाबरोबर युती केली. अशातच एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे युती करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. यावर आता मनसे नेते, संदीप देशपांडे यांनी भाष्य केलं आहे. “राजकारणात कधी काय होईल, हे सांगत येत नाही,” असं सूचक विधान संदीप देशपांडेंनी केलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संदीप देशपांडे म्हणाले, “आताचे मुख्यमंत्री निदान भेटत आहे. आधी अडीच वर्षे मुख्यमंत्री असणारे कुणालाच भेटत नव्हते. महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे घेऊन जातात. त्यावर सकारात्मक मार्ग निघतो. शेवटी जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी आपण राजकारणात आहोत. यासाठी राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये भेट होत असेल, तर त्यात वावगं नाही.”

“युतीचा निर्णय राज ठाकरे घेतील”

“तसेच, राजकारणात कधी काय होईल? हे सांगता येत नाही. २०२४ च्या पोटात काय दडलंय आहे, हे कुणाला माहिती? पण, युतीचा निर्णय राज ठाकरे घेतील. तो महाराष्ट्र, हिंदूत्व आणि मराठी माणसाच्या हिताचा असेल,” असं संदीप देशपांडेंनी म्हटलं.

हेही वाचा : मनसेचे पुण्याकडे अधिक लक्ष, लोकसभा लढण्याची तयारी सुरू

“राजकारणात मराठी माणूस आणि हिंदुत्वाला यश मिळालं पाहिजे”

“राज ठाकरेंकडे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा आहे. काहींकडे वास्तुचा वारसा असेल. बाळासाहेब ठाकरेंचे विचार, महाराष्ट्राबद्दल त्यांचे असलेले स्वप्न, हिंदुत्वाची कास हे सगळं राज ठाकरेंमध्ये आहे. राजकारण करताना मराठी माणूस आणि हिंदुत्वाला यश मिळालं पाहिजे,” अशी आशा संदीप देशपांडेंनी व्यक्त केली.

“राज ठाकरे लोकनेते”

राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या युतीबाबत आमदार संजय शिरसाट यांनीही भाष्य केलं आहे. “आगामी लोकसभा निवडणुकीत संपूर्ण ताकदीने आम्हाला विजय मिळवायचा आहे. राज ठाकरे हे लोकनेते आहेत. त्यांच्या सभांना लाखोंची गर्दी होते. भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राज ठाकरे यांची ताकद एकत्र आली तर लोकसभेत ४५ हून अधिक जागा जिंकणे अवघड नाही. जानेवारी महिन्यात जेव्हा महायुतीची जागावाटपाची चर्चा होईल, तेव्हा या मुद्द्यावरही चर्चा होईल, असा माझा अंदाज आहे,” असं शिरसाटांनी म्हटलं.

हेही वाचा : ठाणे, डोंबिवलीत मनसेची चहूबाजूंनी कोंडी

“राज ठाकरे महायुतीत असावेत”

“फेब्रुवारी महिन्यात लोकसभेची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याआधीच या सर्व घडामोडी होऊ शकतात. आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे की, राज ठाकरे महायुतीत असावेत. पण, हा निर्णय तीनही पक्षांच्या वरिष्ठांच्या हातात आहे. मला वाटतं पक्षश्रेष्ठी हिताचा निर्णय घेतील. तो निर्णय महायुतीला बळकटी देणारा असेल,” असं शिरसाटांनी सांगितलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sandeep deshpandey on raj thackeray and eknath shinde alliance ssa