Sandeep Kshirsagar on Viral Photo: बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात आवाज उचलणारे आणि आरोपींच्या अटकेची मागणी करणारे आमदार संदीप क्षीरसागर यांचे एका तरुणीबरोबरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत. यावर आज त्यांनी प्रतिक्रिया दिली. विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनापासून संदीप क्षीरसागर यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींना अटक करण्याची मागणी आक्रमकपणे लावून धरली. त्यानंतर आज बीड येथील मोर्चात सहभागी झाल्यानंतर त्यांनी व्हायरल फोटोबाबत खुलासा केला. संदीप क्षीरसागर हे बीड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षातून सलग दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत.
काय म्हणाले संदीप क्षीरसागर?
संदीप क्षीरसागर म्हणाले, “सध्या समोर येत असलेला फोटो निवडणुकीदरम्यान व्हायरल करण्यात आला होता. तो फोटो मॉर्फ केलेला आहे. मी कधीही इनशर्ट करत नाही. मी शर्ट बाहेर सोडलेले असते. या फोटोबाबत मी तक्रार केलेली असून फॉरेन्सिक तपासणीसाठीही सदर फोटो पाठवून दिला आहे. संतोष देशमुख प्रकरणात मी आवाज उचलू नये, म्हणून मला शांत करण्यासाठी असला प्रकार केला जात आहे. पण यानिमित्ताने एक सांगतो मी कुणाच्या बापाला घाबरत नाही.”
तो फोटो सर्वात आधी बायकोला दाखवला..
“सदर फोटो व्हायरल झाल्यानंतर तो सर्वात आधी मी माझ्या पत्नीला दाखवला होता. पत्नीही तो फोटो पाहून हसली होती. राजकारणात कोणत्या स्तरापर्यंत जाऊ शकतात, हे त्या फोटोवरून दिसते. निवडणूक काळात तो फोटो व्हायरल करूनही लोकांनी मला विजयी केले. कारण लोकांचा माझ्यावर विश्वास आहे. आगामी अधिवेशनात अशा मॉर्फ फोटोबाबत काहीतरी नियमावली असावी, अशी मागणी करणार आहे”, असेही संदीप क्षीरसागर म्हणाले.
दरम्यान, आज बीडमध्ये संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करण्यासाठी सर्वपक्षीय मोर्चा काढला गेला आहे. या मोर्चात मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटीलही सहभागी झाले आहेत. यावेळी त्यांनी सरकारला इशारा देत म्हटले, “मुख्यमंत्री साहेब तुम्ही लक्षात ठेवा, आरोपींना पाठीशी घालू नका. अन्यथा तुम्हाला पश्चात्ताप होईल. आरोपींना तात्काळ अटक करा”