Sandeep Kshirsagar on Walmik Karad Surrender : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर संपूर्ण राज्यभरात याच प्रकरणाची चर्चा आहे. या प्रकरणात राज्यातील अनेक नेत्यांकडून वाल्मिक कराड हे नाव घेतलं जात आहे. आता पुण्यातील सीआयडी कार्यालयात वाल्मिक कराड हे पोलिसांना शरण आले आहेत.शरण येण्यापूर्वी त्यांनी स्वतःचा एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. ज्यामध्ये त्यांनी स्वतःवरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. राजकीय द्वेषापोटी माझ्याविरोधात आरोप केले जात असून जर पोलीस तपासात मी दोषी आढळलो तर जी शिक्षा होईल, ती भोगण्यासाठी मी तयार असल्याचे ते म्हणाले आहेत. यादरम्यान संतोष देशमुख हत्याप्रकरणात सुरुवातीपासून आक्रमक भूमिका घेतलेले राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते आमदार संदीप क्षीरसागर यांनी वाल्मिक कराडच्या स्वतः निर्दोष असल्याच्या दाव्यावर प्रश्न उपस्थित केला आहे.
संदीप क्षीरसागर यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली, ही भेट झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेली वाल्मिक कराड यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळ्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. याला उत्तर देताना संदीप क्षीरसारगर यांनी, “तुम्ही (वाल्मिक कराड) दोषी नव्हता तर मग पहिल्या दिवासापासून तुम्ही का फरार झाले होते?”, असा प्रश्न उपस्थित केला आहे.
“हा गंभीर विषय महाराष्ट्रासमोर जेव्हा आला, या गुन्हेगारांचे नावे घेऊन जेव्हा सर्वांसमोर बोललो. जिल्ह्यातील सर्वपक्षिय आमदारांनी सभागृहात विषय मांडल्यावर याचे गंभीर्य लक्षात आले. सरकारने लगेच पावले उचलली ज्यामध्ये एसपींची बदली झाली. आजही मुख्यमंत्र्यांना याच विषयावर बोलायला आलो होतो. आज जे गुन्ह्यामध्ये सरेंडर झाले आहेत तो खंडणीचा गुन्हा आहे. पहिल्या दिवसापासून मी मागणी करत आहे की, खंडणीच्या गुन्ह्यामुळेच ३०२ चा गुन्हा झाला आहे. दोन्ही गुन्ह्यामध्ये कनेक्शन आहे. आजही मुख्यमंत्र्यांकडे ही केस अंडर ट्रायल चालवा अशी मागणी केली. ३०२ मध्ये कट कारस्थान म्हणून यामध्ये जे कोणी असतील त्यांच्या मोबाईलचे सीडीआर तपासून त्यांच्यावर करा अशी मागणी केली आहे”.
“मुख्यमंऱ्यांनी काळजी करण्याची गरज नाही. जे कोणी आरोपी असतील, सीडीआरमध्ये ज्यांची नावे असतील त्यांच्यावर कारवाई होणार आहे.” असे सांगितल्याचेही आमदार संदीप क्षीरसागर म्हणाले.
वाल्मिक कराड यांचा दावा काय?
शरण जाण्याआधी पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडीओत वाल्मिक कराड म्हणाले आहेत की, “मी वाल्मिक कराड. माझ्याविरोधात केज पोलीस ठाण्यात खंडणीची खोटी तक्रार दाखल झालेली आहे. मला अटकपूर्व जामिनाचा अधिकार असतानाही पुण्यातील पाषाण रोडवरील सीआयडी कार्यालयात शरण जात आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात जे दोषी असतील त्यांना फाशी द्यावी. पण राजकीय द्वेषापोटी माझे नाव त्यात जोडले जात आहे. पोलीस तपासात जर मी दोषी आढळलो तर न्याय देवता जी शिक्षा देईल, ती भोगण्यासाठी मी तयार आहे.”