मनोज जरांगे पाटलांना दिलेला शब्द राज्य सरकारने पाळला नाही. राज्य सरकारने जरांगे यांच्याकडे मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी एक महिन्याची मुदत मागितली होती. परंतु, दिलेल्या मुदतीत राज्य सरकारने उचित कार्यवाही केली नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले होते. एका बाजूला जरांगे यांचं उपोषण चालू असताना दुसऱ्या बाजूला मराठा आंदोलक आरक्षणासाठी आक्रमक झाले होते. या काळात राज्यात अनेक ठिकाणी रास्ता रोको आणि वाहनांवर दगडफेकीच्या घटना घडल्या. अशातच बीडमध्ये आंदोलनाने अधिक हिंसक वळण घेतलं होतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान, बीडमध्ये माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. तसेच त्यांच्या बीड शहरातील घरावरही दगडफेक झाली. त्यापाठोपाठ आमदार संदीप क्षीरसागर यांच्या घरावरही दगडफेक झाली. क्षीरसागर यांच्या घर आणि कार्यालयावर झालेला हल्ला हा मराठा आंदोलकांनी केल्याचा आरोप काहींनी केला होता. परंतु, हा आरोप स्वतः आमदार संदीप क्षीरसागर यांनी फेटाळला आहे.

आमदार संदीप क्षीरसागर यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, तो हल्ला काही समाजकंटकांनी केला होता. मराठा समाजाचा या हल्ल्याशी काही संबंध नाही. हा प्रकार चुकीचा आहे. माझं घर बीड शहरात आहे. शहरात इतर नेत्यांचीदेखील घरं आहेत. बीडमध्ये अनेक व्यापाऱ्यांची दुकानांची तोडफोड झाली. त्या व्यापाऱ्यांनी आणि सगळ्याच नेत्यांनी सांगितलं की, या हल्ल्याशी आंदोलकांचा काही संबंध नाही. मीदेखील प्रामाणिकपणे हेच सांगेन की त्या हल्याशी मराठा आंदोलकांचा संबंध नाही.

हे ही वाचा >> “भ्रमिष्ट, गद्दार, बेईमान अन्…”; गजानन कीर्तिकरांवर टीका करताना रामदास कदमांची जीभ घसरली

घरावर झालेल्या दगडफेकीबाबत आमदार प्रकाश सोळंके म्हणाले…

क्षीरसागर काका-पुतण्यांच्या घर आणि कार्यालयावर झालेल्या हल्ल्यापाठोपाठ माजलगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावरही दगडफेक झाली होती. तसेच त्यांच्या घराबाहेरील गाड्यांची जाळपोळ झाली होती. हा हल्ला मराठा आंदोलकांनी केल्याचा आरोप सुरुवातीला करण्यात आला. परंतु, पोलिसांनी याप्रकरणी अटक केलेल्या आरोपींपैकी ८ जण हे मराठा नाहीत, अशी माहिती स्वतः आमदार प्रकाश सोळंके यानी दिली. तसेच सोळंके म्हणाले, माझ्या राजकीय विरोधकांनी आणि काही समाजकंटकांनी हा हल्ला केला होता.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sandeep kshirsagar says maratha community nothing to do with attack on my residence asc