आम्ही बिनधास्त आहोत, आम्हाला कसलीही धाकधूक नाही. आम्ही कायदेशीर बाजू तपासूनच आम्ही सगळ्या गोष्टी केल्या आहेत. आम्ही सगळं काही तपासूनच बंड केलं आहे. धाकधूक समोरच्याला आहे असं संदीपान भुमरे यांनी म्हटलं आहे.
कुणी कितीही तारखा देऊ द्या…
संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी अनेक तारखा दिल्या. हे दोघेही सकाळी उठले की त्यांना एकनाथ शिंदे आणि सरकार दिसतं. कितीतरी वेळा सरकार पडेल अशा तारखा दिल्या. त्यांना झोपेतही सरकार पडल्याची स्वप्नं पडत असतील आणि ते सकाळी तुमच्यासमोर बोलत असतात. असा टोलाही संदीपान भुमरे यांनी लगावला.
मराठ्यांना आरक्षण द्यायचं हीच आमची भूमिका
मराठ्यांना आरक्षण देण्याचीच आमच्या सरकारची भूमिका आहे. आठ दिवसांनी बैठका होत आहेत. शिंदे समिती आणि मागासवर्गीय आयोग चांगलं काम करतो आहे. राज्यात आत्तापर्यंत ५४ हजार पुरावे सापडले आहेत. इतरही काम सुरु आहे. ओबीसींवर अन्याय न होता मराठा समाजाला आरक्षण दिलं जावं हीच आमची भूमिका आहे असंही संदीपान भुमरेंनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर यासाठी एकनाथ शिंदे यांनी जसं म्हटलं आहे की तसं अधिवेशन फेब्रुवारी महिन्यात बोलवलं जाईल असंही भुमरे यांनी स्पष्ट केलं.
कुणी राम मंदिरासाठी किती निधी दिला यापेक्षा मंदिर होतंय हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. आम्ही अनेकदा अयोध्येचा दौरा गेला. तिथे जालना आणि संभाजी नगरची मुलं काम करत आहेत. आम्ही त्यांना भेटलो तेव्हा जात काय हा प्रश्न विचारला नाही असंही संदीपान भुमरेंनी म्हटलं आहे.