औरंगाबाद जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आज (७ ऑगस्ट) शिवसेनेच्या शिंदे गटाचे आणि ठाकरे गटाचे आमदार भिडल्याचं पाहायला मिळालं. ठाकरे गटाचे आमदार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि रोजगार हमी तसेच फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांच्यात जोरदार राडा झाला. दोघांमधील वादाचा व्हिडीओ समोर आला आहे. यावेळी ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे संदीपान भुमरे यांच्या अंगावर धावून गेल्याचं पाहायला मिळालं. तसेच दोन्ही नेत्यांचं मोठ्या आवाजात भांडण सुरू होतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कन्नड तालुक्यातल्या निधीवरून दोन्ही नेत्यांमध्ये भांडण सुरू होतं. पालकमंत्री संदीपान भुमरे निधी देत नाहीत, असा आरोप कन्नड मतदारसंघाचे आमदार उदयसिंह राजपूत केला होता. याच मुद्द्यावरून अंबादास दानवे आक्रमक झाले. त्यामुळे भुमरे आणि दानवे यांच्यात वाद झाला.

अंबादास दानवे यांनी विरोधी पक्षातील आमदारांना पालकमंत्र्यांकडून निधी मिळत नसल्याचा आरोप केला. यावर औरंगाबादचे पालकमंत्री आणि शिंदे गटाचे आमदार संदीपान भुमरे यांनीही प्रत्युत्तर दिलं. निधीवाटपाच्या मुद्द्यावरून दोन्ही नेत्यांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी अंबादास दानवे हे संदीपान भुमरे यांच्या अंगावर धावून गेले. त्यानंतर भुमरेही मोठ्या आवाजात दानवेंना प्रत्युत्तर देत असल्याचं पाहायला मिळालं. या राड्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर यावर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. या बैठकीनंतर स्वतः संदीपान भमरे यांनी प्रसारमाध्यमांशी बातचित केली आणि घडलेला प्रकार सांगितला.

पालकमंत्री संदीपान भुमरे म्हणाले, ठाकरे गटाच्या निधीबद्दल बोलण्यापेक्षा तालुक्यांना किती निधी दिला हे महत्त्वाचं आहे. ठाकरे गटाला म्हणण्यापेक्षा कन्नड तालुक्याला किती निधी दिला? इथं ठाकरे गट वगैरे असं काही नाही. इथं तालुका धरला जातो. तालुक्याला किती निधी दिला ते पाहा. जितका निधी वैजापूर, सिल्लोड आणि गंगापूर तालुक्याला दिला तितकाच निधी कन्नड तालुक्याला दिला आहे. सगळ्या तालुक्यांना सारखा निधी देण्यात आला आहे. इतर तालुक्यांना दिला तितकाच निधी कन्नड तालुक्याला दिला आहे. इथे उदयसिंह राजपूत, ठाकरे गट असा काही विषय नाही.

हे ही वाचा >> तेजस ठाकरे सक्रिय राजकारणात प्रवेशासाठी सज्ज? किशोरी पेडणेकरांच्या ‘त्या’ ट्वीटमुळे चर्चांना उधाण!

दरम्यान, बैठकीवेळी त्यांना (अंबादास दानवे) आवाज का वाढवावा लागला? असा प्रश्न प्रसारमाध्यमंच्या प्रतिनिधींनी उपस्थित केल्यावर संदीपान भुमरे म्हणाले, विरोधी पक्षनेत्याचं ते कामच आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sandipan bhumare explains dispute with ambadas danve in aurangabad meeting asc
Show comments