शिवसेना ( ठाकरे गट ) नेते, माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि मंत्री संदीपान भुमरे यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. भुमरेंनी ७०० एकर जमीन कुठून आणली? असा सवाल चंद्रकांत खैरे यांनी उपस्थित केला होता. यावर संदीपान भुमरेंनी ‘माझ्याकडं ७०० एकर जमीन सापडली तर ५०० एकर खैरेंना देणार,’ असं म्हटलं आहे.
चंद्रकांत खैरे नेमकं काय म्हणाले?
“संदीपान भुमरेंकडे वडिलांची फक्त ४ एकर जमीन होती. नंतर २५ एकर झाली. आता ७०० ते ८०० एकर जमीन झाली म्हणतात, ही जमीन कुठून आणि कशी आली,” असा प्रश्न चंद्रकांत खैरे यांनी संदीपान भुमरेंना विचारला आहे. यावर संदीपान भुमरेंनी ‘टीव्ही ९ मराठी’ला प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा : “उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना वारकऱ्यांबाबत अत्यंत भयंकर…” नेमकं काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?
“मी दुरड्या विकून राजकारण…”
“माझ्या वडिलांचं सातबारा दाखवतो. राजकारणात येण्यापूर्वी वडिलोपार्जित बागायती आणि कोरडवाहू सुद्धा जमीन होती. मी दुरड्या विकून राजकारण केलं नाही. खैरेंना मी धडा शिकवणार आहे. खैरेंनी निवडणुकीला निवडून येऊन दाखवावं,” असं आव्हान संदीपान भुमरेंनी दिलं आहे.
“…तर मला २०० एकर ठेवावी”
“माझ्याकडं ७०० एकर जमीन सापडली, तर मला २०० एकर ठेवावी. बाकीचे ५०० एकर जमीन चंद्रकांत खैरेंनी घ्यावी,” असंही संदीपान भुमरेंनी सांगितलं.
हेही वाचा : “संजय राऊतांनी आमच्या पक्षाचा दर्जा तपासण्यापेक्षा…”, राष्ट्रवादीचं ठाकरे गटाला प्रत्युत्तर
“ज्या खात्याला कोणी ओळखत नव्हतं, त्याला…”
मंत्रिमंडळातून शिंदे गटातील ५ मंत्र्यांची गच्छंती होणार असून, त्यात संदीपान भुमरेंचही नाव आहे. याबद्दल विचारल्यावर भुमरेंनी म्हटलं की, “या बातम्या विरोधकांनी पेरल्या आहेत. यात कोणताही अर्थ नाही. कारण, सर्व मंत्री आपल्या खात्याचं काम करतात. आमच्यावर वरिष्ठांच्या नाराजीचं कारण काय? ज्या खात्याला कोणी ओळखत नव्हतं, त्याला नावारूपास आणलं. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी रोजगार हमी खात्याचं कौतुक केलं आहे.”