आमदारांनी केलेल्या उठाव यशस्वी झाला नसता, तर एकनाथ शिंदे यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली असती, असा खळबळजनक दावा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दोन दिवसांपूर्वी केला होता. यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. केसरकर म्हणाले होते की, “अस्मितेसाठी एकनाथ शिंदेंनी बंड केलं. उद्धव ठाकरे वचन द्यायचे आणि तोडायचे. शिंदेंना खालच्या दर्जाची वागणूक दिली. एकनाथ शिंदे हे विधिमंडळाचे नेते होते. त्यांचा अपमान का केला? याचं उत्तर दिलं पाहिजे. एकनाथ शिंदे तेव्हा म्हणाले होते जेव्हा वाटेल उठाव यशस्वी होणार नाही, तेव्हा एकच गोष्ट केली असती. माझ्याबरोबर आलेल्या सर्व आमदारांना परत पाठवलं असतं आणि माझ्या डोक्यात गोळी झाडून घेतली असती.
दीपक केसरकर यांच्या वक्तव्यावर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. शिंदे गटातील आमदार आणि एकनाथ शिंदे यांनी बंड केलं तेव्हापासून आतापर्यंत त्यांच्याबरोबर असलेले आमदार संदीपान भुमरे यांनी मात्र वेगळं वक्तव्य केलं आहे. संदीपान भुमरे म्हणाले की, केसरकर काय म्हणाले, काय नाही, ते मला माहिती नाही. मला एवढंच सांगायचंय की, मी सुरुवातीपासूनच त्यांच्याबरोबर (एकनाथ शिंदे) होतो. पहिल्या टप्प्यात त्यांच्याबरोबर जे आमदार गेले त्यात मी होतो.
हे ही वाचा >> उदयनराजे-शिवेंद्रराजेंच्या वादात देवेंद्र फडणवीसांची शिष्टाई, दोघांशी चर्चेनंतर म्हणाले…
संदीपान भुमरे म्हणाले, मी सुरुवातीपासूनच एकनाथ शिंदे यांच्याबरोबर होतो, अगदी शेवटपर्यंत मी त्यांच्याबरोबर होतो. इथून निघाल्यापासून त्यांच्या गाडीतच होतो, परंतु अशी काही परिस्थिती (दीपक केसरकर यांनी दावा केली आहे अशी परिस्थिती) निर्माण झाली नव्हती. केसरकर यांनी त्यांचं काही वैयक्तिक मत व्यक्त केलं असेल तर ते मला काही माहिती नाही. परंतु मला एवढंच सांगायचं की, मी अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यत त्यांच्याबरोबर होतो. तेव्हा ज्या काही घडामोडी झाल्या त्या सगळ्या मला माहिती आहेत. तसेच डिप्रेशन (नैराश्य) वगैरे असं काही नव्हतं.