राज्यातल्या अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. सरकारने या निवडणुका तातडीने घ्याव्यात अशी मागणी सातत्याने लोकांकडून आणि विरोधी पक्षांकडून होत आहे. शिवसेनेचा ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेसने याबाबतची मागणी लावून धरली आहे. त्याचबरोबर राज्यातलं सरकार बेकायदेशीर आहे असा दावा करत शिवसेनेचा ठाकरे गट पुन्हा निवडणुकांची मागणी करतोय. दरम्यान, खासदार संजय राऊत आज (३१ मे) एका पत्रकार परिषदेत म्हणाले, निवडणुका घ्यायला हे सरकार का घाबरतंय.
संजय राऊत म्हणाले, निवडणुका होऊन जाऊ द्या मग दूध का दूथ आणि पाणी का पाणी होईल. यावर आता शिवसेनेच्या शिंदे गटाकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. मंत्री संदीपान भुमरे याबद्दल म्हणाले, संजय राऊतांना कोणीतरी सांगा तुम्ही एखादी निवडणूक लढून दाखवा. आम्ही तर निवडणूक लढणारच आहोत. त्यानंतर दूध का दूध आणि पाणी का पाणी होणारच आहे. २०२४ च्या निवडणुकीत आम्ही तुम्हाला दाखवून देऊ दूध का दूध आणि पाणी का पाणी.
मंत्री संदीपान भुमरे म्हणाले की, संजय राऊतांना म्हणावं, तुम्ही एखाद्या मतदार संघातून निडणूक लढा मग कळेल दूध का दूध आणि पाणी का पाणी. नुसतं आयत्या मतावर निवडून यायचं आणि टीव्हीसमोर, मीडियासमोर जाऊन गप्पा मारायच्या असं सगळं सुरू आहे. त्यापेक्षा जनतेत जा, निवडणुकीला उभे राहा, मग कळेल कसं असतं.
हे ही वाचा >> “आता तर कहर झाला”, अजित पवारांचा ‘त्या’ प्रकारावरून सरकारवर हल्लाबोल; विचारला ‘हा’ सवाल!
संदीपान भुमरे म्हणाले, संजय राऊत हा आयता नेता आहे. रोज सकाळी साडेनऊला टीव्ही चालू केला आणि टीव्हीवर संजय राऊत दिसला की, लोक चॅनेल बदलू लागले आहेत. लोक कंटाळलेत यांना. आम्ही यांना २०२४ ला दाखवून देऊ, कारण पुन्हा युतीचं सरकार येणार आहे आणि एकनाथ शिंदे साहेबच पुन्हा मुख्यमंत्री होणार आहेत.