“तुम्ही वाचलेले पहिले पुस्तक कोणते”, असा प्रश्न केला की, बहुतांश मराठी माणसांचे उत्तर ‘श्यामची आई’, असेच येते. साने गुरुजींनी लिहिलेले श्यामची आई हे पुस्तक वाचले नाही अथवा त्याविषयी ऐकले नाही, असा मराठी माणूस सापडणे विरळच! महाराष्ट्रात संतसाहित्याखालोखाल सर्वांत जास्त वाचले गेलेले पुस्तक म्हणजे ‘श्यामची आई’ आहे, असे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. आईच्या प्रेमात ओतप्रोत बुडालेला ‘मातृहृदयी’ लेखक, अशी साने गुरुजींची ओळख अगदी ठळक झालेली आहे. साने गुरुजींचे साहित्य ‘रडवे’ वा ‘हळवे’ आहे, असे म्हणून त्यांची निर्भर्त्सनाही झाली आहे. मात्र, साने गुरुजींच्या मातृहृदयी ओळखीपल्याड एक बंडखोर सेनानीही होता, हे फारसे अधोरेखित होताना दिसत नाही. लेखक या ओळखीशिवाय शिक्षक, पत्रकार, समाजसुधारक, स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक असलेल्या साने गुरुजींची राजकीय विचारसरणी गांधीवादी होती, कम्युनिस्ट होती की समाजवादी होती, याबाबतही संदिग्धता दिसते. पंढरपूरचे विठ्ठल मंदिर अस्पृश्यांसाठी खुले व्हावे, यासाठी बेमुदत उपोषण सुरू केल्यानंतर गांधींबरोबर त्यांचे वाद वा गैरसमजही झाले होते. २०२४ हे साने गुरुजींचे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी अर्थात १२५ वे जयंती वर्ष आहे. आज त्यांची पुण्यतिथी. या निमित्ताने त्यांच्या एकूण व्यक्तीत्व आणि विचारांचा धांडोळा घेताना या प्रश्नांची उत्तरे शोधणे महत्त्वाचे ठरेल.
साने गुरुजींचे साहित्य ‘रडवे’ की त्यागासाठी सिद्ध करणारे?
१८९९ साली जन्मलेल्या साने गुरुजींना अवघे ५० वर्षांचे आयुष्य लाभले. या ५० वर्षांच्या काळात पहिली २० वर्षे सोडली, तर समाजकारणातील ३० वर्षांमध्ये साने गुरुजींनी स्वातंत्र्यसैनिक शिक्षक, समाजसुधारक, पत्रकार, राजकारणी, लेखक अशा विविध भूमिका पार पाडल्या. त्यातील जवळपास आठ वर्षे ते तुरुंगात होते. या इतर सगळ्या भूमिका पार पाडत असतानाच त्यांनी जवळपास ११३ पुस्तकांचे लिखाण केले आहे. साधारण वयाच्या पंचविशीपासून ते सातत्याने लिहित होते. उर्वरित २५ वर्षांच्या आयुष्यात गुरुजींनी केलेले लेखन आणि कार्य थक्क करणारे आहे. नोकरी सोडल्यावर हाती असलेल्या केवळ १९ वर्षांत सामाजिक-राजकीय काम, खूप मोठ्या प्रमाणात प्रवास यातून मिळालेल्या वेळात त्यांनी प्रचंड लेखन केले. जगातील उत्कृष्ट अशा १७ कलात्मक ग्रंथांचे अनुवाद त्यांनी केले. काही कथासंग्रह, चरित्रे, कादंबऱ्या, गीते, नाटके, कविता व काही वैचारिक पुस्तकेही त्यांनी लिहिली. इतक्या कमी कालावधीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर साहित्यनिर्मिती करूनही ‘हळवे’ नि ‘रडवे’ साहित्यिक म्हणून गुरुजींची निर्भर्त्सना झाली. त्यांच्या लिखाणाबद्दल विचारवंत नरहर कुरुंदकर यांनी एके ठिकाणी म्हटले आहे, “साने गुरुजींचे वाङ्मय रडके आहे, असा एक आक्षेप घेतला जातो. त्यांचे वाङ्मय रडके आहे, या आक्षेपात एका मर्यादेमध्ये तथ्य आहे, दुसऱ्या मर्यादेमध्ये तथ्य नाही. साने गुरुजींच्या डोळ्यांसमोर असणारा वाचकवर्ग हा सदैव १४ ते १८ वर्षे वयाचा विद्यार्थीवर्ग आहे. ह्या विद्यार्थ्याला प्रत्येक गोष्ट जास्तीत जास्त सुलभ-सोपी करून सांगणे आणि प्रामुख्याने ध्येयवादाचा नि भावनांचा अधिकाधिक भर तिथे देणे, या गोष्टी आवश्यक आहेत. या विद्यार्थ्यांशी बोलताना गुरुजींचा तो पिंड बनलेला आहे. ते मनानेच तिथे समरस झाले आहेत.” पुढे ते असेही म्हणतात, “गुरुजींचे वाङ्मय माणसाला दुबळे बनवते हा जो विचार आहे, तो मी कबूल करायला तयार नाही. कारण- हे वाङ्मय वाचून एक पिढी त्याग करायला सिद्ध झाली; ही तर गोष्ट अनुमानाने सांगण्याची गरज नाही, तर पुराव्याने सिद्ध होण्याजोगी आहे. ती एक पिढी हे वाङ्मय वाचताना रडली आणि रडता-रडता जेलमध्ये जायला तयार झाली. एक पिढी हे वाङ्मय वाचून कष्ट भोगायला तयार झाली, दारिद्य्रात राहायला तयार झाली, मार खायला तयार झाली. तेव्हा या वाङ्मयाने माणसाला दुबळे बनवले, हा चार्ज आम्ही मान्य करणार नाही.”
याबाबत ‘साधना साप्ताहिका’चे संपादक विनोद शिरसाठ यांनी म्हटले, “‘कुमार आणि पुढील कार्ये’ या पुस्तकामध्ये साने गुरुजींनी असे म्हटले आहे की, तुम्ही लोक माझे लेखन पै किमतीचे समजत असाल; परंतु भूक लागली असता, चुरमुरेच तुम्हाला लाखमोलाचे वाटतात आणि तुम्हाला न मिळालेली पक्वान्नेही कवडीमोलाची असतात. माझे लेखन रडके आहे, असे लोक म्हणतात; पण मी तुम्हाला सांगतो की, माझे लेखन वाचून अनेक क्रांतिकारक पेटलेले आहेत. तुरुंगात जायला तयार झालेले आहेत. अनेकांनी आपले आयुष्य उधळून लावण्याची तयारी दाखवली आहे. माझे लेखन कवडीमोलाचे वाटत असेल; पण ते वाचूनच अनेक जण पेटलेले आहेत.”
मातृहृदयी की बंडखोर सेनानी?
साने गुरुजींची मातृहृदयी ही ओळख अधिक ठळक का झाली, याबाबत बोलताना विनोद शिरसाठ म्हणाले, “साने गुरुजींच्या बरोबर असलेले, त्यांच्यानंतरच्या दुसऱ्या वा तिसऱ्या फळीतील त्यांचे सहकारी वा अनुयायी त्यांना फक्त ‘मातृहृदयी’ मानत नव्हते. मग ही ओळख ठळक कधीपासून आणि का झाली, हा संशोधनाचा विषय आहे. प्रत्येक जण बालवयात ‘श्यामची आई’मधील एक तरी धडा वाचतोच. मग ते विद्यार्थ्यांचे पाय कसे चेपायचे वा विद्यार्थ्याने कॉपी केली, तर स्वत:च कसे रडायचे या कथा प्रत्येकाने कधी ना कधी वाचलेल्या असतात. थोडक्यात, जे झेपणारे आहे, तेवढेच लोकांनी अधिक स्वीकारले आहे, असे दिसते.”
याबाबत बोलताना राज्यशास्त्राच्या अभ्यासक आणि ‘साने गुरुजी – व्यक्ती आणि विचार’ या पुस्तकाच्या लेखिका प्राध्यापक चैत्रा रेडकर यांनी म्हटले, “गुरुजी जे राष्ट्रवादाच्या संदर्भात प्रश्न उपस्थित करत होते, ते राष्ट्रीय चळवळीतल्या लोकांना पसंत पडत नव्हते. ते कम्युनिझमबद्दल जे प्रश्न उपस्थित करत होते, ते कम्युनिस्टांना मानवणारे नव्हते आणि गुरुजी जी धर्माची नवी व्यापक व्याख्या करून भूमिका घेत होते, ती समाजवाद्यांना मान्य होत नव्हती. कारण- सानेगुरूजींचा चौकटीबाहेर पाहणारा दृष्टीकोन त्यांच्या समकालिनांना समजला नाही, त्यामुळे हा माणूस सत्शील आहे; पण भाबडा आहे, अशीच अनेकांची धारणा बनली. कारण, गुरुजींची एकूण भूमिका आणि मांडणी कोणत्याच रूढ राजकीय विचारधारेच्या चौकटीत बसणारी नव्हती. त्यामुळे वरवर पाहता, सर्वांच्याच दृष्टीने गुरुजींच्या सच्चेपणाला आव्हान न देता, त्यांना न्याय देणारी सर्वांत सोपी अशी गोष्ट उरते ती त्यांच्याकडे ‘मातृहृदयी’ म्हणून बघण्याची!”
साने गुरुजी मुलांसमोर वेगळ्या पद्धतीने व्यक्त व्हायचे, तर आंदोलन आणि सभांमध्ये त्यांचा आवेश वेगळा असायचा. याबाबतचा अनुभव खुद्द पु. ल. देशपांडे यांनी आपल्या एका लेखात शब्दबद्ध केला आहे. ते म्हणतात की, “एरवी साने गुरुजींना मी लहान मुलांना गोष्टी सांगताना पाहिले; तेव्हा त्या मुलांत लहानात लहान मूल जर कोणी असेल, तर साने गुरुजी हाच मनुष्य होता! ही मुले मोठी वाटावीत इतके गुरुजी छोटे वाटायचे. हे साने गुरुजी परळला कामगार मैदानावर उभे असताना भाषणबंदीचा हुकूम बजावला गेला. तो हुकूम हातात घेऊनच साने गुरुजी स्टेजवर चढले आणि स्वातंत्र्य म्हणजे काय आहे आणि या जगात त्यासाठी कोणी कुठे काय काय हालअपेष्टा सहन केल्या यासंबंधी अप्रतिम तेजस्वी निरूपण केले! असे वाटले की, काल गच्चीवर लहान मुलांना गोष्टी सांगणारे साने गुरुजी, ते हेच साने गुरुजी आहेत काय?”
‘मानवतावादाचा सर्वश्रेष्ठ मराठी प्रवक्ता’
साने गुरुजींनी शेतकरी आणि कामगारांसाठी अनेक आंदोलने केली. स्वातंत्र्यलढ्यातील सहभागासाठी ते कित्येकदा तुरुंगात गेले आणि हालअपेष्टाही सहन केल्या. साने गुरुजींच्या राजकीय भूमिकेबद्दल बोलताना विनोद शिरसाठ म्हणाले, “साने गुरुजींची खरी ओळख कोणती, असे जर मला विचारले, तर ‘मानवतावादाचा सर्वश्रेष्ठ मराठी प्रवक्ता’, असे मी म्हणेन. त्यांच्या आयुष्याचे सारे संचित या चार शब्दांत आहे. या संचिताच्या भोवती बाकी सगळे धागे आले आहेत. मग तो समाजवादाचा असेल, गांधीवादाचा असेल, काँग्रेसचा असेल वा कम्युनिस्ट चळवळीचा असेल. साने गुरुजींवर महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर, संतसाहित्य, विविध क्रांतिकारक आणि जगभरातील वेगवेगळ्या तत्त्ववेत्त्यांचा प्रचंड प्रभाव होता. एवढे पैलू असलेल्या माणसाला एकाच साच्यात बसवणे कठीण जाते. उदाहरणार्थ- साने गुरुजी समाजवादी होते, असे म्हणण्याऐवजी साने गुरुजींच्या एकूण व्यक्तिमत्त्वामध्ये समाजवादाचा एक पैलू होता, असे मी म्हणेन.” पुढे ते म्हणाले की, १९४८ साली साने गुरुजींनी साधना या साप्ताहिकाच्या पहिल्या संपादकीयामध्ये लिहिले आहे की, ‘विषमता आणि वैरभाव नष्ट करण्याची थोर साधना आपणास करावयाची आहे. या ध्येयाने हे साप्ताहिक जन्म घेत आहे.’ गुरुजींची विचारधारा ही विषमता आणि वैरभाव नष्ट करण्याची असल्याने जो-जो यासाठी काम करीत असेल, त्याच्याबरोबर कधी ना कधी त्यांच्या संबंध आलेला असणे स्वाभाविक आहे. मग त्यात कम्युनिस्टही आले. काँग्रेस विचाराचे तर ते होतेच. मात्र, जेव्हा पक्ष आपल्या विचारापासून हटतो आहे, हे लक्षात आले तेव्हा ते काँग्रेस पक्षापासूनही दूर गेले.”
‘एका पांडुरंगाने केले दुसऱ्या पांडुरंगाला मुक्त’
साने गुरुजींनी आपल्या आयुष्यात अनेक आंदोलनांमध्ये सहभाग घेतला तसेच स्वत:हून सुरु केलेली अनेक आंदोलने यशस्वी केली. त्यामध्ये महात्मा गांधींचे सविनय कायदेभंग आंदोलन, बैलगाड्यांवर टोल टॅक्स लावल्याबद्दल आंदोलन, प्रताप मिल आंदोलन, धुळे गिरणी कामगार युनियनचे ताळेबंदविरोधी आंदोलन, ऑगस्ट क्रांती आंदोलनात भूमिगत, शिक्षकांच्या वेतनवाढीसाठी उपोषण, तसेच पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा म्हणून केलेले आंदोलन अशा काही प्रमुख आंदोलनांचा समावेश होता. त्यामधील विठ्ठल मंदिरप्रवेशाचे आंदोलन विशेष गाजले. विठ्ठल मंदिरात अस्पृश्यांनाही प्रवेश मिळायला हवा, या मागणीसाठी बेमुदत उपोषण करण्याची घोषणा त्यांनी केली होती. त्यासाठी त्यांनी चार महिने महाराष्ट्रभर दौरा करून जनजागृतीही केली होती. साने गुरुजींनी हे उपोषण करू नये, असे गांधींचे म्हणणे होते; तर उपोषण करण्याच्या निर्णयावर साने गुरुजी ठाम होते. अस्पृश्यतेबद्दलचा गांधीवादी दृष्टिकोन आपण स्वीकारलेला असल्याचे साने गुरुजी या आंदोलनादरम्यान ठामपणे सांगत होते. परंतु, इतर गांधीवादी मंडळींना आणि खुद्द गांधींनासुद्धा पंढरपूरच्या सत्याग्रहाची प्रस्तुतता व अर्थपूर्णता यांबद्दल पुरेशी खात्री वाटत नव्हती. त्याशिवाय, साने गुरुजींचा दृष्टिकोन अस्सल सत्याग्रही व्यवहाराच्या नियमांशी बांधिलकी राखणारा आहे का, याबद्दल काही जण साशंक होते.
या सगळ्या प्रकरणाबद्दल बोलताना प्राध्यापक चैत्रा रेडकर म्हणाल्या, “सत्याग्रह करतानाचे नियम वा पथ्ये किती प्रमाणात पाळले गेले आहेत अथवा नाहीत, याबाबत गांधीवादी मंडळींचा आक्षेप होता. या आंदोलनाबाबत गांधींकडे चुकीच्या पद्धतीने माहिती पोहोचली होती, हाही एक मुद्दा होताच; पण त्याबरोबरच बडव्यांचे मनपरिवर्तन करणे हा आपला हेतू आहे की जातीच्या प्रश्नावर जनजागृती करणे हा आपला हेतू आहे, हादेखील गांधीवादी मंडळींचा एक महत्त्वाचा मुद्दा होता. याबाबत विनोबा भावे यांचेही मत असे होते की, जनजागृती करणे हा उद्देश असेल, तर उपोषणाच्या आधी चार महिने काढलेल्या यात्रेतून हा उद्देश पूर्णत्वास गेला होता. ठिकठिकाणी केलेल्या जनजागृतीमधून विविध मंदिरे आणि विहिरीदेखील अस्पृश्यांसाठी खुल्या झाल्या होत्या. बॉम्बे असेंब्लीने संमत केलेल्या कायद्याने लवकरच मंदिर खुले होणार असताना पुन्हा उपोषणाची गरज काय? असा हा मतप्रवाह होता. दुसरीकडे फक्त कायद्याने मंदिर खुले व्हावे, असे मला वाटत नसून बडव्यांचे मनपरिवर्तन व्हायला हवे, असे साने गुरुजींचे मत होते.” पुढे त्या म्हणाल्या, “साने गुरुजींचे नेमके म्हणणे गांधींपर्यंत पोहोचलेच नाही. त्यांनी मांडलेल्या अनेक मुद्द्यांपैकी ‘मी उपोषणाची घोषणा केली असल्याने आता जर मी माघारी वळलो, तर लोक नावे ठेवतील’ एवढे एकच वाक्य गांधींच्या कानावर ठळकपणे घालण्यात आल्याने गांधींचे साने गुरुजींच्या सत्याग्रह मार्गाबद्दलच गैरसमज निर्माण झाले. त्यातून त्यांनी गुरुजींना उपोषण मागे घेण्यास सांगितले होते. मात्र, फक्त कायद्याने नाही, तर स्वेच्छेने मंदिर उघडले जावे, हा गुरुजींचा मुद्दा होता.” गुरुजींनी केलेले हे आंदोलन यशस्वी ठरले. एका पांडुरंगाने दुसऱ्या पांडुरंगाला मुक्त केले, असे तेव्हा बोलले गेले.
साने गुरुजींचा हिंदू धर्म
साने गुरुजींचा धर्म हा व्यापक होता. त्यांनी धर्म आणि धार्मिकता या गोष्टी चांगल्या पद्धतीने समजून घेतल्या होत्या. त्यांच्या धार्मिक असण्यामध्ये द्वेष आणि विषमतेला स्थान नव्हते. ते धर्मसुधारणेबाबत प्रचंड आग्रही होते. गुरुजींनी हिंदू संस्कृतीची ओळख करून देणारी पुस्तके जशी लिहिली, तशीच त्यांनी मुस्लीम आणि इतर धर्मांविषयीही मांडणी केली. त्यांच्या धार्मिकतेविषयी बोलताना प्राध्यापक चैत्रा रेडकर म्हणाल्या, “सनातन धर्माची व्याख्या करताना गुरुजी म्हणतात की ‘सनातनो नित्य नूतन:’ म्हणजे सनातन धर्म म्हणजे काय, तर जो नव्या नव्या संदर्भामध्ये नव्याने स्वत:ला प्रकट करतो, तो म्हणजे सनातन धर्म होय. सगळ्या पारंपरिक मूल्यांना नवा आशय आणि अर्थ देण्याचा मोठा अवकाश गुरुजींनी केलेल्या या व्याख्येमध्ये आहे. त्यामुळे तो अवकाश वापरण्याची शक्यता गुरुजी दाखवत होते.”
विठ्ठल मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा साठी बेमुदत उपोषण सुरू करताना केलेल्या भाषणात साने गुरुजी म्हणतात, “संत बंडखोर होते. संस्कृतमधील ज्ञान त्यांनी मराठीत आणले. संत कारुण्यसागर होते. झोपडी-झोपडीत त्यांना ज्ञान न्यायचे होते, खरा धर्म न्यायचा होता, त्यांचा छळ झाला. ज्ञानेश्वरादिकांवर बहिष्कार, कुंभाराचे मडकेही त्यांना मिळू दिले नाही. तुकोबांचे अभंग इंद्रायणीत फेकण्यात आले. एकनाथी भागवत काशीच्या पंडितांनी गंगेत फेकले. संत मेल्यावर त्यांच्या पालख्या आपण उचलतो. परंतु, ते जिवंत असतांना त्यांचे आपण छळच केले; परंतु ते डगमगले नाहीत. वाळवंटांत तरी त्यांनी भेदभाव नष्ट केला. त्यांच्या पुढचे पाऊल आपण नको का टाकायला? समाज पुढे जात असतो. नदी थबकली की संपली. समुद्राला मिळेपर्यंत ती पुढे जाणार. आपणही ‘अवघाचि संसार सुखाचा होई’पर्यंत पुढे गेले पाहिजे; परंतु आपण पुढे गेलो नाही. पंढरपूरच्या वाळवंटात एकमेकांना भेटू; परंतु देवाजवळ अजूनही हरिजनांना जाता येत नाही. वारी करून घरी आल्यावर गावांत शिवाशिव ती आहेच. शेवटी पंढरपूर स्वत:जवळ आणायचे असते. एकनाथ म्हणतात, काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल।.”
गुरुजींच्या धर्माविषयीच्या भूमिकेबद्दल बोलताना विनोद शिरसाठ यांनी असे म्हटले, “गुरुजींनी लिहिलेली ‘खरा तो एकचि धर्म’ ही प्रार्थना मानवतावादाचे सर्वश्रेष्ठ प्रतीक आहे. हीच प्रार्थना जगभर का वापरली जाते आणि तिला कुणीच आव्हान का देत नाही? तिला हिंदुत्ववादीही आव्हान का देऊ शकत नाहीत? कारण- गुरुजींचा हिंदू धर्म उदार आणि व्यापक होता.”