लोकसत्ता प्रतिनिधी
रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील मासरंग भागात वन्य प्राण्यांची शिकार करण्यासाठी फिरणाऱ्या आठ जणांना सिंगल बॅरल बंदूक, जिवंत काडतूस व इतर मुद्देमालासह संगमेश्वर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पथक पोलीस वाहनाने १२ एप्रिलला रात्रीच्या वेळी गस्त घालत असताना मासरंग -शेनवडे दरम्याने महिंद्रा पिकअप बोलेरो (एमएच ०८ इ ०९५०) मधून वन्य प्राण्यांच्या शिकारिच्या उद्देशाने फिरणा-या दशरथ दिलिप बारगोडे (वय ३९) रा. पोमेंडी बुद्रुक, कारवांचीवाडी, जि. रत्नागिरी, विजय भिकाजी पाचकुडे (वय ४२) रा. शेनवडे ता. संगमेश्वर, सुभाष दाजी बोबळे (वय ५०) रा. शेनवडे, चिलेवाडी ता. संगमेश्वर, गणेश गंगाराम लाखण (वय ३२) रा. शेनवडे, खालचीवाडी ता. संगमेश्वर, सत्यवान सिताराम जोगळे (वय ३८) रा. शेनवडे ता. संगमेश्वर, रमेश सिताराम लाखण (वय ४३) रा. शेनवडे खालचीवाडी ता. संगमेश्वर, सुरेश मोळू जोगळे (वय ३८) रा. शेनवडे जोगळेवाडी ता. संगमेश्वर, दिलिप रामचंद्र बारगोडे, रा. पोमेंडी बुद्रुक कारवांची वाडी इत्यादी आठ जणांना ताब्यात घेतले.
दिलिप रामचंद्र बारगोडे यांच्या नावे शेती संरक्षण परवाना असलेली सिंगल बॅरल बंदूक काडतूस बंदूक, शक्तिमान १२ एक्सप्रेस नं दीडशे रुपये किमतीची एक काडतूस, शक्तिमान १२ एक्सप्रेस ४.८ सहाशे रुपये किमतीचे चार काडतूस आणि विजेच्या सहा बॅटऱ्या, पिकअप बोलेरो व बंदूक असा एकूण २ लाख ५७ हजार २५० रुपयांच्या मुद्देमालासह या आठ जणांना ताब्यात घेतले.
या प्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. ६५/२०२५, शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम, ३/२५,३० भारतीय न्याय संहिता कलम ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याविषयी संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस उपअधिक्षक शिवप्रसाद पारवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत कांबळे अधिक तपास करीत आहेत.