संगमनेर : येथील अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विजेवर चालणारी दुचाकी तयार करण्यात यश मिळवले आहे. विशेष म्हणजे त्यांनी तयार केलेली इलेक्ट्रिक दुचाकी बाजारात मिळणाऱ्या इतर दुचाकींपेक्षा स्वस्तात तयार झाली आहे. ही दुचाकी तुलनेने कमी वेळेत चार्जिंग होऊन जास्त मायलेज देऊ शकणारी आहे. याशिवाय या दुचाकीत मोबाईल कनेक्टिव्हिटी, वाहन परवाना, चालकाची ओळख प्रणाली यासह विविध सुविधा देण्यात आल्या असल्याची माहिती संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे यांनी दिली.
अमृतवहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील तिसऱ्या वर्षातील टीम ट्रायडेंटने ही ई-बाइक बनवली असून या दुचाकीच्या चाचणी प्रसंगी संस्थेच्या विश्वस्त शरयू देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, प्राचार्य डॉ. एम. ए. व्यंकटेश, शाखा संचालक डॉ. जे. बी. गुरव, विभागप्रमुख वाकचौरे, डॉ. सुनील कडलग आदींसह शिक्षक उपस्थित होते.
नवी दिल्ली येथील नोएडा विद्यापीठात होणाऱ्या आयएसआय इंडिया या राष्ट्रीय पातळीवरील संस्थेने नवकल्पना व उद्योजकतेला चालना देण्यासाठी आयोजित प्रदर्शनामध्ये या बाईकचा समावेश करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे नेतृत्व तनिष्क वडनेरे व मयुर पालवे केले आहे त्यांना. मेकॅनिकल विभाग प्रमुख डॉ. व्ही. डी. वाकचौरे, प्रो. योगेश गुंजाळ व इलेक्ट्रिकल विभाग प्रमुख डॉ. एस. एस. कडलग, ए. के. पाठक यांनी मार्गदर्शन केले आहे.
यावेळी बोलताना विश्वस्त शरयू देशमुख म्हणाल्या की, माजी मंत्री आणि संस्थेचे आधारस्तंभ बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेतील विद्यार्थ्यांना संशोधनासाठी सातत्याने प्रोत्साहन दिले जात आहे. पर्यावरण पूरक ठरणाऱ्या विद्युत वाहनांचे आजकाल अत्यंत महत्व वाढले आहे. भविष्यात याला मोठी मागणी राहणार असून भरपूर संशोधनाला देखील खूप संधी आहेत. ऊर्जा कार्यक्षमतेच्या दृष्टीने आदर्श असून, प्रदूषण कमी करण्यास मोठी मदत करतात. या प्रकल्पाद्वारे विद्युत वाहनांच्या या वैशिष्ट्यांना आणखी उजाळा मिळेल आणि भविष्यातील स्वच्छ, टिकाऊ वाहतूक व्यवस्थेत नव्या दृष्टीकोनाचा विकास होईल.
विद्यार्थ्यांनी तयार केलेली बाईक अवघ्या ७.९ सेकंदात प्रति तास ० ते ८० किमी गती घेते, जीपीएस ट्रॅकिंग, मोबाइल कनेक्टिव्हिटी आणि सुरक्षित वाहनचालनासाठी ओळख प्रणालीची सुविधा देण्यात आली आहे. २ तास ४० मिनिटांत पूर्ण चार्ज होणारी ही दुचाकी एकदा चार्ज केल्यानंतर ९० किमी पर्यंत चालते. शिवाय, आय. सी. इ. वाहनांसाठी किफायतशीर दरात रेट्रोफिटिंग किटसुद्धा यात आहे. यशस्वीरित्या ई बाईक बनवल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, शरयू देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, प्राचार्य डॉ. एम. ए वेंकटेश आदींसह विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.