संगमनेर : माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीला महाराष्ट्र शासनाच्या पणन विभागाने स्मार्ट प्रकल्पांतर्गत गुणवत्तेच्या क्रमवारीत अहिल्यानगर जिल्ह्यातून प्रथम, तर नाशिक विभागातून द्वितीय क्रमांक मिळाल्याची माहिती सभापती शंकरराव खेमनर व सचिव सतीश गुंजाळ यांनी दिली. सलग दुसऱ्या वर्षी संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीला हा प्रथम क्रमांक मिळाला आहे.
राज्य सरकारच्या पणन विभागाने बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प अंतर्गत राज्यातील ३०५ बाजार समित्यांची वार्षिक क्रमवारी प्रमाणित केली. गुणवारी निश्चितीनंतर निकाल घोषित करण्यात आला. याबाबत अधिक माहिती देताना खेमनर म्हणाले, संगमनेर बाजार समितीने शेतकरी, व्यापाऱ्यांना अत्याधुनिक सुविधा दिल्या आहेत. संगणकीय कामकाज, उपबाजार समित्यांचे कामकाज, स्वच्छता, कामकाजावरील विश्वास अशा सर्व सुविधा या निकषांमध्ये संगमनेर बाजार समिती जिल्ह्यात अग्रमानांकित ठरली आहे.
बाजार समितीच्या वाटचालीत सभापती खेमनर, उपसभापती गीताराम गायकवाड, सर्व संचालक, सचिव सतीश गुंजाळ आदींनी सातत्यपूर्ण काम केले. त्याचा एकत्रित परिपाक म्हणजे सलग दुसऱ्या वर्षी जिल्ह्यात प्रथम येण्याचा बहुमान होय, अशी भावना सचिव गुंजाळ यांनी व्यक्त केली. समितीला मिळालेल्या पुरस्काराबद्दल माजी मंत्री थोरात, माजी आमदार थोरात, डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, थोरात कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ, दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष डॉ. जयश्री थोरात आदींनी अभिनंदन केले.